नाशिक : शहर परिसरात वेगाने पसरणारा करोना संसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने खाटांच्या नियोजनाला वेग दिला आहे. पंचवटीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात ३०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने संकुलाची पाहणी केली. याशिवाय शहर परिसरात अन्य ठिकाणीही कोविड केअर रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

महापालिकेकडे सध्या ७०० खाटा असून खासगी रुग्णालयालयातील खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आठवडाभरात शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक हजार ३७२ वर पोहचली आहे. रुग्णवाढीचा दर पाहता पुढील काळासाठी दोन हजार ७०० खाटांचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून होत आहे. ठक्कर डोमनंतर आता पंचवटीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात ३०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी संकुलाच्या इमारती प्रशस्त असून करोनामुळे सध्या खेळ होत नसल्याने त्यांचा उपयोग होत नाही. या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या पथकाने बुधवारी पाहणी केली. तसेच समाज कल्याण विभाग वसतिगृहाच्या जागेत सध्या ३०० खाटांचे कोविड केअर केंद्र असून या ठिकाणी २०० खाटा वाढविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

मेरीच्या जागेत असलेल्या मराठा समाज विद्यार्थी वसतिगृहात १८० खाटांचे नियोजन केले जात असून हे काम लवकर पूर्ण होईल. नाशिकरोड येथील विस्तारित बिटको रुग्णालयात चार दिवसात १०० खाटांचे कोविड केअर रुग्णालय सुरू होणार असून अन्य ठिकाणी ३०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.