21 September 2020

News Flash

करोनाग्रस्त नवजात मातांना दिलासा

नव्या निकषानुसार बाळाला स्तनपान करणे शक्य

नव्या निकषानुसार बाळाला स्तनपान करणे शक्य

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक :  करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असून त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषत हा विळखा गरोदर तसेच नवजात बालकांच्या मातांनाही पडला आहे. नव्या निकषानुसार करोनाग्रस्त माता आता बाळाला दूध पाजू शकणार असल्याने मातांनी आनंद व्यक्त केला आहे.

मार्च महिन्यापासून करोनाचा शिरकाव राज्यासह जिल्ह्य़ात झाला. करोनाची साखळी खंडित करण्यासाठी टाळेबंदीचा पर्याय स्वीकारला गेला. करोना संकटात बहुतांशी खासगी दवाखाने बंदच राहिले. अगदीच गरज भासली तेव्हांच गरोदर मातांची तपासणी झाली. पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला.  सव्‍‌र्हेक्षणात गरोदर माता, नवजात मातांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. यामुळे बाळाला आईपासून दूर करण्यात आले. परिणामी बाळाचे अन्न असलेल्या आईच्या दुधापासून त्याला वंचित रहावे लागले. मातेलाही बाळाची भेट न झाल्याने दूध न येणे, दूध पाजले न गेल्याने छातीत दुधाच्या गाठी होणे, रक्तस्त्राव, गर्भपिशवीचे दुखणे अशा वेगवेगळ्या तक्रारींना तोंड द्यावे लागले. दूध न मिळाल्याने बाळांचे अपेक्षित वजन  वाढले नाही. या सर्व परिणांमाचा विचार करता आरोग्य विभागाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयात गरोदर माता तसेच नवजात मातांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. ग्रामीणमध्ये कळवण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांची व्यवस्था करण्यात आली. दोघांचीही नियमित तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे. जन्मानंतर अवघ्या तासाभरात होणाऱ्या स्तनपानाला मात्र त्यांना मुकावे लागले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने करोना संसर्गित नवजात माताही बाळांना स्तनपान करू शकतील, अशी नवीन सूचना केली आहे.

हा निर्णय होईपर्यंत नवजात मातांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. याविषयी एका करोना संसर्गित मातेने म्हणणे मांडले. करोना असल्याचे बाळ झाल्यावर त्यांना समजले. बाळ निरोगी होते. पण त्याला जवळ घेता येत नव्हते. जवळचे नातेवाईक करोना असल्यामुळे फिरकेनासे झाले. दवाखान्यातील परिचारिकांच्या मदतीने त्या मातेचे दैनंदिन व्यवहार सुरू होते. बाळाला दूध मिळत नसल्याने त्याचे वजन वेगाने कमी झाले. त्याची किरकिर वाढली. आपल्याकडे ‘दूध पेढी’ नसल्याने तसेच सोबत असलेल्या कुठल्याच नवजात मातेने तिच्या बाळाला करोनाचा संसर्ग होईल या भीतीने दूध दिले नाही. दुधाच्या भुकटीवर बाळ महिनाभर राहिले, असे संबंधित महिलेने सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी करोना संसर्गित मातेला बाळाला स्तनपान करता येणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी स्तनांची स्वच्छता, हातात मोजे आणि मुखपट्टी अनिवार्य आहे. मातेने हात अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने धुणे गरजेचे असून बाळाच्या ज्या अवयवांना आईचा स्पर्श झाला ते नियमित स्वच्छ करण्यात यावे. यासाठी मातेला आरोग्य अधिकारी, कर्मचारी मदत करत असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

नवीन मार्गदर्शक सूचना

माता करोना संसर्गित असली तरी नवजात बाळाला मातेने स्पर्श करावा. सहा महिन्याच्या आतील बाळास स्तनपान देण्यात यावे. सहा महिने पूर्ण झाल्यावर त्याला पोषक आहार सुरू करावा. सर्दी, खोकला, ताप असला तरी माता स्तनपान देऊ शकते. मातेच्या दुधात करोना विषाणू असल्याचा पुरावा आजवर मिळालेला नाही. स्तनपानाचे फायदे हे संसर्ग होण्याच्या धोक्यापेक्षा अनेक पटीने जास्त असतात. संसर्ग बाळाला होऊ नये यासाठी स्तनपान करण्याअगोदर हात स्वच्छ धुवावेत, मुखपट्टी वापरावी. बाळाला दूध देतांना किंवा अन्य आहार देतांना हाताचा वापर टाळत वाटी, चमच्याचा वापर करावा. स्तनपान देणाऱ्या मातांना मानसिक आधार मिळणे महत्वाचे आहे. माता खूप आजारी असेल, स्तनपान देऊ शकत नसेल तर तिचे दूध स्वच्छ वाटीत काढून चमच्याने बाळाला पाजावे.  व्यवस्थित हात धुणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे, मुखपट्टी हे संरक्षणाचे उपाय आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार गरजेचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:48 am

Web Title: covid positive mothers can breastfeed newborn baby according to the new criteria zws 70
Next Stories
1 गोदापूजन, महाआरतीत लोकप्रतिनिधींचा सहभाग 
2 मंदिरे बंद ठेवणे हा राज्य सरकारचा आडमुठेपणा
3 पुणे-नाशिक रेल्वे मार्ग वेळेत झाल्यास विकासाला बळ
Just Now!
X