जिजामाता रुग्णालयालगतचा रस्ता बंद; मातीच्या गोण्यांद्वारे आधार देणार

नाशिक : मेन रोडवरील पालिकेच्या जुन्या इमारतीच्या मागील बाजूकडील भिंतीला तडा गेला असून सोमवारी एक-दोन दगड निखळल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या इमारतीतून नाशिक पूर्व विभागाचे कामकाज चालते. पालिकेचे २०० अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी काम करतात. मागील बाजूकडील भिंतीला तडा गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्या खालील भागात कोणी जाणार नाही, यादृष्टीने अडथळे लावले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिजामाता रुग्णालयाजवळून मेनरोडकडे ये-जा करणारा मार्ग पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

इमारतीच्या मागील बाजूकडील भिंतीवर झाडे उगवल्याने तडा गेला होता. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तेथील झाडे काढली. तेव्हापासून भिंतीवरील तडा ठळकपणे उजेडात आला. सोमवारी याच परिसरात भिंतीतून काही दगड निखळले. ही बाब लक्षात आल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. १९३७ मध्ये बांधलेल्या पालिका मुख्यालयाचा पुरातत्त्व इमारतींमध्ये समावेश होतो. इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिकेने पुरातत्त्व विभागाला सादर केला आहे. परंतु, तो अद्याप रखडलेला आहे. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार तडा गेलेल्या भिंतीला मातीच्या गोण्यांद्वारे आधार दिला जाणार असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी संजीव बच्छाव यांनी सांगितले. इमारतीच्या भिंतीला जिथे तडा गेला आहे, त्याखालील भागात कोणी जाऊ नये म्हणून ताडपत्री आणि लोखंडी गजाने अडथळा लावण्यात आला असल्याची माहिती नाशिक पूर्वचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी दिली.

झाडाच्या बुंधामुळे भिंतीतून दगड बाहेर आले असून पालिकेने पत्रे लावले आहेत. तरीही पावसाळ्यात भीती राहतेच. कामावर ये-जा करताना लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतो, याकडे स्थानिक रहिवासी नीलेश जाधव यांनी लक्ष वेधले तर महापालिकेने आठ दिवसांपूर्वी इमारतीच्या भिंतीवर वाढणारे झाड काढले होते. मात्र अजूनही दगड पडण्याचा धोका आहे. आजच्या घटनेत फार नुकसान झाले नाही. मात्र, भविष्यात अशा धोकादायक भिंतीमुळे जीवितहानी होऊ शकते. महापालिकेने अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे येथील एक व्यावसायिक अशोक भूतडा यांनी सांगितले.