भोवळ येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये भोवळ येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये ३९ वर्षांच्या एका कारखाना कामगाराचा समावेश आहे. नीलेश सूर्यवंशी (सरोज संकुल, पाथर्डी फाटा) आणि महेश मनोहर (सचदे अगरबत्ती, रविवार कारंजा)अशी चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. नीलेश अंबड औद्योगिक वसाहतीतील ताज हॉटेल पाठीमागील कम्प्लेट ग्रुप कारखान्यात सकाळच्या सुमारास काम करीत असताना चक्कर येवून पडल्याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना रविवार कारंजा परिसरात घडली. सचदे अगरबत्ती दुकानावर राहणारे महेश मनोहर हे सकाळी पेठे हायस्कूलसमोरून पायी जात असताना रिक्षा थांब्यावर अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळले. रिक्षाचालक भगवान उगले यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भ्रमणध्वनी लंपास

सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या अल्पवयीन मुलांना दमदाटी करीत चोरटय़ांनी भ्रमणध्वनी लंपास केला. शिवाजीनगर भागात ही घटना घडली. याबाबत कृष्णा चंदिले (१७, शिवाजीनगर) या युवकाने तक्रार दिली. कृष्णा आणि त्याचा मित्र घराकडे जात असताना वाटेत त्यांनी दुचाकीस्वारास आपणास पुढेपर्यंत सोडून देण्यास सांगितले. दुचाकीस्वाराने दोघांना गाडीवर बसवीत काही अंतरावर नेले. दोघांचे भ्रमणध्वनी घेऊन पलायन केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस प्रवासात  दागिन्यांची चोरी

नाशिकरोड बस स्थानकातून संगमनेरला बसने निघालेल्या महिलेचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. नाशिकरोड ते शिंदे गावातील टोल नाका या दरम्यान ही घटना घडली. या बाबत सुनिता संकपाळ (५९, संगमनेर) यांनी तक्रार दिली. संकपाळ या सायंकाळी बसने संगमनेरला जात असताना चोरटय़ांनी आसनावरील जागेत ठेवलेल्या बॅगेतून पर्स लांबविली. पर्समध्ये दागिने, महत्त्वाचे दस्तावेज, एटीएम कार्ड असा सुमारे ४० हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.