तडिपार गुंडाला आश्रय देणाऱ्या नगरसेवक पवन पवारला अटक

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय पक्षांमार्फत पोलीस यंत्रणेच्या कार्यशैलीवर बोट ठेवले जात असताना दुसरीकडे तडिपार गुंड आणि गुन्हेगारांना काही राजकीय पदाधिकारी व नगरसेवक आश्रय देत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. जेलरोडवरील संपर्क कार्यालयात तडिपार गुंड संतोष कुशारेला आश्रय दिल्याप्रकरणी नगरसेवक पवन पवारविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पवारविरुद्ध याआधी पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, खंडणी यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगार आणि राजकीय पदाधिकारी यांच्या निकटच्या हितसंबंधावर या निमित्ताने प्रकाश पडला आहे.

शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असताना सध्या सर्वच राजकीय पक्षांनी पोलीस यंत्रणेला लक्ष केले आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे आरोपही त्यांच्यामार्फत केले जात आहे. तथापि, काँग्रेस आघाडीच्या काळात गुन्हेगारांचे शहर अशी नाशिकची जेव्हा ओळख तयार झाली, तेव्हादेखील राजाश्रयाने फोफावलेली गुन्हेगारी कारक ठरल्याचे सर्वज्ञात होते. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी जेव्हा राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला, तेव्हा गुन्हेगारांचे पालन पोषण करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. वाहनांची जाळपोळ, लुटमार, टोळक्यांचा धुडगूस, दागिने खेचून नेणे आदी घटनाक्रमांनी सध्या नाशिक धगधगत आहे. वाढत्या गुन्हेगारीला राजकीय पदाधिकारी कसा हातभार लावतात, यावर नाशिकरोड पोलिसांच्या कारवाईने प्रकाश पडला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोम्बिंग ऑपरेशन, अवैध धंद्यांवर धाडसत्र, अवैध मद्यविक्री व टवाळखोरांवर कारवाई करत आहे.

मंगळवारी रात्री पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविली. नाशिकरोड पोलिसांचे पथक जेलरोड भागात कारवाई करत होते. यावेळी स्थानिक अपक्ष नगरसेवक पवन पवारचे शिवाजी नगर येथील संपर्क कार्यालय बंद असल्याचे दृष्टिपथास पडले. या कार्यालयाची झडती घेण्यासाठी संबंधित नगरसेवकाला बोलावले असता संबंधिताने त्यास विरोध करत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी संपर्क कार्यालयाचे टाळे तोडण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधिताने ते उघडले. त्यावेळी कार्यालयात तडिपार गुंड संतोष कुशारे लपल्याचे निदर्शनास आले. खून, प्राणघातक हल्ले या स्वरुपाचे गंभीर गुन्हे कुशारेवर दाखल आहेत. या गुंडाला कार्यालयात दडवत नगरसेवक पवारने गुंडाशी घनिष्ट संबंध दाखवून दिले. पोलिसांनी कुशारेला अटक केली. ज्या पवन पवारने त्याला आपल्या कार्यालयात आश्रय दिला तो मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आला आहे.

त्याच्याविरुद्ध काही वर्षांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा आरोप होता. त्यातून त्याची सुटका झाली. मात्र, खंडणीसाठी धमकावणे व तत्सम स्वरुपाचे गंभीर गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल आहेत. विशेष म्हणजे, त्याने प्रभाग सभापतीपदही भूषविले. पवारची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी बुधवारी गुन्हेगाराला आश्रय दिल्याच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. सायंकाळी त्याला नाशिकरोडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. या घटनाक्रमाने राजकीय पदाधिकारी व गुन्हेगार यांच्या संबंधावर नव्याने प्रकाश पडला आहे.