अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील अ‍ॅल्युमिनियमचे सुटे भाग व भंगार माल ट्रेलरमधून नेताना भिवंडी येथे परस्पर त्याची विल्हेवाट लावून २८ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी संशयित चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी येथील कामदेवी परिसरातील दिलीपकुमार सुलवालिया यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून भंगार खरेदी केले होते. ते मुंबईला आणण्याची जबाबदारी ब्रिजवासी कंपनीचा ट्रेलरचालक संशयित राकेश विश्वकर्मा (रा. मध्य प्रदेश याच्यावर सोपविली. चालकाने कारखान्यातून २१.५२० टन वजनाचे अ‍ॅल्युमिनियमचे भंगार साहित्य ट्रेलरमध्ये भरले. यानंतर तो मुंबईच्या दिशेने रवाना झाला. मुंबईजवळील भिवंडी येथे ट्रेलरमधील भंगार साहित्य विक्री करून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या भंगार मालाची किंमत २८ लाख ६८ हजार रुपये इतकी आहे. सुलवालिया यांना भिवंडी परिसरात ट्रेलर रिकामा दिसल्याने संशय आला. माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर संशयित फरार झाला आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांनी आत्महत्या केली. या प्रकरणी वावी आणि सटाणा पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वावीच्या बेलापूर परिसरातील बाबुराव गोरे यांची मुलगी शालिनी हिचा विवाह एप्रिल २०१६ मध्ये सिन्नर तालुक्यातील नीलेश दिघे याच्याशी झाला. लग्नानंतर एक महिन्यातच लग्नात योग्य मानपान, हुंडा तसेच सोन्याच्या दागिण्यांसाठी तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. सासरच्या जाचाला कंटाळत तिने मंगळवारी रात्री उशिरा शेतातील विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत त्रासाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पती नीलेश, सासरे विठ्ठल दिघे, सासू मथुराबाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती व सासऱ्यास अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सटाणा तालुक्यातील चौधाणे अशीच दुसरी घटना घडली.  तालुक्यातील तिळवण येथील दादाजी बोरसे यांची मुलगी सोनाली हिचा विवाह २०१२ मध्ये चौधाणे गावातील धर्मा पवार याच्याशी झाला होता.  लग्नाला इतकी वर्षे होऊनही मूलबाळ नाही या कारणावरून पती व त्याचे आई-वडील, भाऊ, वहिनी यांनी तिचा मानसिक, शारीरिक छळ करीत मारहाण केली. या जाचाला कंटाळत सोनालीने विहिरीत उडी मारली. सोनालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.