ठिकठिकाणी चोरीच्या घटना

शहरासह जिल्ह्य़ात दिवाळीच्या आनंदात सर्वजण मग्न असताना ठिकठिकाणी चोरटय़ांनी लाखोंचा ऐवज लंपास करीत आपलीही दिवाळी साजरी केली. या संदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चांदवड तालुक्यातील शेळके वस्ती परिसरात शनिवारी शेळके कुटुंब घरात झोपले असताना रात्री चार चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्याची बहीण सुनीता नाईकवाडे व तिचा लहान मुलगाही या ठिकाणी थांबले. समाधान शेळके यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चाकूने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यामुळे सुमन शेळके यांच्यासह समाधान यांची बहीण सुनीता नाईकवाडे यांनी अंगावरील दागिने चोरांच्या स्वाधीन केले. दुसरी घटनाही चांदवड तालुक्यातच घडली. डावखर नगर परिसरात कृष्णा पवार (६१) हे कुटुंबासमवेत राहतात. रविवारी रात्री त्यांची पत्नी शयन कक्षात झोपलेली असताना चार संशयितांनी घरात प्रवेश केला. पवार यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील ५८ हजार ५०० रुपयांचे दागिने काढून घेतले. या दोन्ही घटनांची नोंद चांदवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेजवळील कातोरे वस्तीत दशरथ कातोरे राहतात. रविवारी कातोरे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत रात्री दरवाजा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. यावेळी दागिन्यांसह भ्रमणध्वनी, चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या चाव्या असा अंदाजे ४९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील कोठुरे येथे नितीन म्हस्के (३०) कुटुंबासमवेत राहतात. शुक्रवारी कुटुंबातील सदस्य दीपावली सुटीनिमित्त बाहेर गेले असता चोरटय़ाने कुलूप आणि कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लॅपटॉप तसेच दागिने असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे प्रमिला चोळके (४३) यांच्या घरातून संशयित चांगदेव चोळके याने ७६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.