सेनेच्या माजी नगरसेवकाची पोलिसांकडे धाव

सिडकोतील दुकानातून बळजबरीने मद्याच्या बाटल्या नेऊन नंतर मालकास मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आक्रमक अशा शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्यावरच अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची वेळ आली. काही वर्षांपूर्वी सिडकोत धुमाकूळ घालणाऱ्या टिप्पर टोळीमधील अनेकांना पोलिसांनी आधीच कारागृहात धाडले आहे.

राजकीय वरदहस्त लाभल्याने काही वर्षांपूर्वी शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या उदयास आल्या. वेगवेगळ्या भागात या टोळ्यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी दहशत पसरवली. सिडकोतील टिप्पर टोळी ही त्यापैकीच एक. समीर पठाण आणि शकील पठाण म्होरके असलेल्या या टोळीने चार-पाच वर्षांपूर्वी सिडकोत धुडगूस घातला होता. खून, खंडणीसाठी अपहरण, प्राणघातक हल्ले आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत.

संबंधितांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी या टोळीतील अनेकांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. यामुळे सिडकोतील संबंधितांच्या कारवाया संपुष्टात आल्याचे चित्र असताना सेनेच्या माजी नगरसेवकाला खंडणीसाठी धमकावण्याचा प्रकार पुढे आला आहे.

तक्रारदार माजी नगरसेवक मामा ठाकरे यांचे शुभम पार्क येथे मद्याचे दुकान आहे. रविवारी दुपारी निखिल बाळू पगारे (राजरत्ननगर) याने दुकानात येऊन मद्याच्या दोन बाटल्या घेतल्या. कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली असता पगारेने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे यांनी संशयित निखिल पगारेशी संपर्क साधला असता

त्याने आपल्याला ओळखले नाही का? असा प्रश्न करीत मी टिप्पर टोळीचा माणूस आहे. तुला धंदा करायचा असेल तर तातडीने एक लाख रुपये पाठवून दे, अन्यथा तुझा गेम करू, अशी धमकी दिली. यानंतर ठाकरे यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी संशयित पगारेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन

टिप्पर गँगने पुन्हा डोके वर काढल्याने व्यापारी, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टिप्पर गँगमधील अनेक गुन्हेगार आधीच कारागृहात आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी व्यापारी, व्यावसायिकांना धमकी देऊन खंडणीची मागणी करीत असेल तर घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी केले आहे.