22 April 2019

News Flash

गुन्हेगारी वाढली, तरीही पोलीस उपक्रमांमध्ये मग्न

नवीन वर्षांच्या प्रारंभी तर कायदा सुव्यवस्था अधिकच धोक्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : शहरात खून, दरोडा, सोनसाखळी खेचून नेणे, वाहन चोरी, घरफोडी आदी गुन्ह्य़ांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये घट झाल्याची माहिती अलीकडेच पोलिसांनी दिली होती. या काळात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वाढल्याची आकडेवारी दिली गेली. त्यात निश्चितच तथ्य आहे. परंतु गतवर्षीची स्थिती २०१९ मध्ये कायम राहील काय, याबद्दल अनेकांना साशंकता आहे. महिनाभरात सहा खून झाले. रस्त्यावर लूटमार, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या प्रकारात भ्रमणध्वनीची भर पडली. वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून चीजवस्तू लंपास होतात.

काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी २०१८ वर्षांतील गुन्ह्य़ांची माहिती दिली होती. २०१७ च्या तुलनेत खुनाच्या घटना सहाने कमी झाल्या. इराणी टोळ्यांवरील कारवाईमुळे सोनसाखळी खेचून नेण्याचे गुन्हे कमी झाले. मोटार वाहन चोरी, इतर चोऱ्यांमध्ये घट झाली. खुनाचा प्रयत्न, बलात्कार, महिलांशी संबंधित गुन्हे, अपहरण, विनयभंग या गुन्ह्य़ांमध्ये मात्र वाढ झाली. खुनाच्या प्रयत्नाचे सर्व गुन्हे उघडकीस आणले. एम. डी. अमली पदार्थ जाळे, गांजा जाळे, २१ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या संशयितांसह अनेक परप्रांतीय टोळ्यांना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे. यातील काही बाबतीत तथ्य असले तरी लूटमारीचे सत्र मागील वर्षीही सुरूच होते. नवीन वर्षांच्या प्रारंभी तर कायदा सुव्यवस्था अधिकच धोक्यात आली आहे. महिनाभरातच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सहा खून झाले.  खून झाल्यावर पूर्ववैमनस्य, किरकोळ वाद अशी कारणे पोलिसांकडून दिली जात असली तरी भरदिवसा हत्या करण्यापर्यंत गुंडांची मजल जातेच कशी, गुन्हेगारांची शस्त्रे घेऊन फिरण्याची हिंमत कशी होते, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. पोलिसांचा कोणताही वचक नसल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.नवीन वर्षांत गुन्हेगारीचा आलेख उंचावण्यामागे पोलिसांचा कमी झालेला वचक हे महत्त्वाचे कारण आहे. गुन्हेगारी रोखण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याऐवजी पोलीस सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहेत. मागील दोन वर्षांत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘दोस्त ऑफ नाशिक’ (डॉन)मधून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावरील निराधारांसाठी ‘ऑपरेशन आधार’, ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध होण्यासाठी ‘नो हॉर्न डे’द्वारे प्रबोधन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर क्लब’ची स्थापना, लहान मुलांसाठी छोटा पोलीस, भिक्षेकरी मुक्त अभियान, मीच माझी रक्षक, तंबाखूमुक्त समाजाचा संदेश देण्यासाठी दुचाकी फेरी, नाइट रन असे अनेक उपक्रम राबविले गेले. ‘स्त्री-पुरुष समानता आणि महिलांची सुरक्षा’ हा संदेश देण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बराच वेळ अशा उपक्रमात खर्ची पडतो. त्यामुळे मुख्य काम सोडून पोलीस भलत्याच कामात गुंतल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची नागरिकांची भावना आहे. पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्यावर ‘गुन्हेगारांना पळता भुई थोडी..’ होते, याची अनुभूती नाशिककरांनी तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या कार्यकाळात घेतली आहे.

सामान्य नागरिकांना पोलिसांविषयी आदर, आत्मीयता नाही, उलट त्यांना भीती वाटते. ज्या गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटायला हवी, त्यांना ती वाटत नाही. पोलीस यंत्रणेला आपला धाक, दरारा निर्माण करण्यात अपयश आले. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आले, यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस वेगवेगळे उपक्रम, प्रयोग राबवितात. त्याचा कितपत लाभ झाला? गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांचे मुख्य काम आहे. या कामावर लक्ष केंद्रित केल्यास बरेच प्रश्न सुटतील. अनेक प्रकरणांत तक्रारीच घेतल्या जात नाहीत. यामुळे रेकॉर्डवरील गुन्ह्य़ांच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात गुन्हे अधिक असतील.

अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी

First Published on February 12, 2019 1:07 am

Web Title: crime increased in nashik but police still busy in activities