भाजीपाला खरेदी करून घराकडे निघालेल्या महिलेची सोनसाखळी मोटारसायकलने आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेली. गोविंदनगर भागात हा प्रकार घडला. याबाबत ज्योती सोनवणे (अमृतवेल पार्क) यांनी तक्रार दिली. सोनवणे या भाजीपाला खरेदी करून घराकडे येत असताना गोविंदनगर येथील श्री बंगल्यासमोर मोटारसायकलने आलेल्या दोघांपैकी एकाने सुमारे ३० हजार रुपयांची सोनसाखळी ओरबाडून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिन्यात सोनसाखळी चोरीच्या सात घटना घडल्या. त्यात साडेतीन लाखांहून अधिक किमतीचे सोने चोरटय़ांनी लंपास केले. सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना त्या रोखण्यासाठी उपाय होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

युवकास मारहाण

टोळक्याने घरात शिरून युवकास बेदम मारहाण केली. पेठेनगर परिसरातील या प्रकारात संतोष सोमवंशी (२८, शांतीमंगल अपार्टमेंट) या युवकाने तक्रार दिली. तक्रारदार आपल्या पत्नीशी लग्न करेल, या संशयातून संशयित हा पाच साथीदारांना घेऊन तक्रारदाराच्या घरी आला. टोळक्याने युवकास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या वेळी संशयित पतीने तक्रारदारास तलवारीचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीची पोलीस वाहनास धडक

पाइपलाइन रस्त्यावरील सिग्नलवर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पोलीस वाहनाचे नुकसान झाले. दुचाकी चालकाने अमली पदार्थाचे सेवन केले होते. दत्तू भोये (गंगापूर गाव) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. शहर पोलिसांचे वाहन सिग्नलमुळे उभे होते. सिग्नल तोडून भरधाव आलेली दुचाकी पोलीस वाहनास धडकली. या घटनेत पोलीस वाहनाच्या दरवाजाचे नुकसान झाले. दुचाकीवर मागे बसलेला हिरामण मोंढे (गंगापूर गाव) हा युवक जखमी झाला. तपासात दुचाकीस्वार दत्तू भोये याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.