मुलाच्या नावाने लॉटरी लागल्याच्या भूलथापा देत एकाची फसवणूक करण्यात आली. या बाबत सवितानगर भागात राहणारे सुनील बाबू (मूळ फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दाखल केली आहे. बाबू यांच्या भ्रमणध्वनीवर गेल्या वर्षी एकाने स्नॅपडील कंपनीतून बोलत असून तुमच्या मुलाच्या नावाने सव्वा सहा लाखांची लॉटरी लागल्याची माहिती दिली.

नोंदणी करण्यासाठी आठ हजार ४०० रुपये राजकुमार पटेल यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. बाबू यांनी विश्वास ठेवून ती रक्कम भरली. संशयितांनी पुन्हा १८ हजार ६०० रुपये भरण्यास सांगितले. बाबू यांनी नकार दिल्यावर संशयितांनी रक्कम न भरल्यास लॉटरीची रक्कम मिळणार नसल्याचे सांगून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजल्याने महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला. रेखा संजय कापुरे (३३, महाजननगर, अंबड) असे या महिलेचे नाव आहे. त्या ८० टक्के भाजल्या होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

साक्षीदारास धमकी

दुचाकीस्वाराचा रस्ता रोखून टोळक्याने न्यायालयात साक्ष दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. येथील हॉटेल एक्स्प्रेस इन भागात ही घटना घडली. या संदर्भात हेमंत पिंगळे (गोपाळ सोसायटी, जेलरोड) यांनी तक्रार दिली. पिंगळे एका गुन्ह्य़ात साक्षीदार आहेत. रात्री ते पाथर्डी फाटा परिसरात आले होते. दुचाकीवर जात असताना चार जणांनी त्यांना अडवले. गुन्ह्य़ात साक्ष दिल्यास मारण्याची धमकी देऊन टोळक्याने पलायन केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग करणारा जेरबंद

वडाळा गाव परिसरात महिलेचा रस्ता अडवीत विनयभंग करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. अक्षय देसले (३१, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. वडाळा गावातील महिला दुपारी आपल्या बहिणीस गावातील शाळेत सोडून घराकडे परतत असताना दुचाकीवर आलेल्या संशयिताने महिलेचा हात पकडून आपल्या मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.