टँकरच्या धडकेत महिला ठार

पेठरोडवरील चांभारलेणी परिसरात टँकरची दुचाकीला धडक बसल्याने महिला ठार झाली. कांचन कामदेव पाटील (४८, मखमलाबाद शिवार) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचन पाटील या आपल्या मुलासोबत अ‍ॅक्टिवाने प्रवास करीत होत्या. पेठरोडवरील घराजवळ रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव टँकरची दुचाकीला धडक बसली. कांचन पाटील या दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. मुलगा विनायक पाटील यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सागंण्यात आले.

विवाहितेवर बलात्कार

समाजात बदनामीची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. आपणास मुक्त करण्यासाठी न्यायालयीन वादात पतीच्या बाजूने साक्ष देऊ नये, अशी गळ घालत संशयिताने महिलेस मारहाण केल्याने हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित नीलेश उन्हवणेविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता आणि संशयित हे एकमेकांचे परिचित आहेत. समाजात बदनामी करण्याची धमकी देत संशयिताने वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुचाकी लंपास

बिटको चौक परिसरातील सोसायटीच्या वाहनतळात उभी केलेली मोटारसायकल चोरटय़ांनी लंपास केली. याबाबत सुशांत बागूल यांनी तक्रार दाखल केली आहे. बागूल हे बिटको पॉइंट येथील मिथील अपार्टमेंट येथे गेले होते. वाहनतळावर त्यांनी मोटारसायकल उभी केली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.