नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र कायम असून वेगवेगळ्या घटनांमध्ये रिक्षासह दोन मोटारसायकली चोरण्यात आल्या. पहिली घटना नालंदा हॉटेललगतच्या पेट्रोल पंपावर घडली. याबाबत मजिद सादिक शेख या रिक्षाचालकाने तक्रार दिली. शेख यांनी मध्यरात्री पेट्रोल पंपावर आपली रिक्षा उभी केली होती. चोरटय़ांनी ती पळवून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना जयभवानी रस्त्यावर घडली. याबाबत कचेश्वर घोडे (साईदिशा अपार्टमेंट, जाचकनगर) यांनी तक्रार दिली. घोडे यांची बुलेट सोसायटीच्या वाहनतळातून चोरण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना मखमलाबाद रस्त्यावरील भाजी बाजार परिसरात घडली. याबाबत अनिलकुमार जमलामोला यांनी तक्रार दिली. ते दुचाकीने भाजी बाजारात गेले होते. मारुती मंदिराजवळ उभी केलेली त्यांची दुचाकी चोरण्यात आली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र खेचून पलायन

वडाळा-पाथर्डी रस्त्याने पायी जाणाऱ्या ६० वर्षांच्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीने आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेले. गुरू गोविंद सिंग महाविद्यालयासमोर ही घटना घडली. याबाबत शोभा घुले (रा. सराफनगर) यांनी तक्रार दिली.

घुले दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी कलानगरकडून सराफ लॉन्सकडे पायी जात असताना गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पाठीमागून दुचाकीने आलेल्या चोरटय़ाने २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.