सातपूर परिसरातील एका कार्यक्रमास परवानगी देण्याच्या प्रकरणात नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करून २४ तास उलटत नाही तोच सातपूर ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास शुक्रवारी दुपारी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या अभ्यागत कक्षात पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. न्यायालयात प्रविष्ट असलेल्या एका गुन्ह्य़ात पकडलेले वाहन सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे सातपूर ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव याने पोलीस चौकीचे बांधकाम करण्याचे निमित्त पुढे करीत
पैशांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाकडून या तक्रारीची खातरजमा करण्यात आल्यावर सापळा रचण्यात आला.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याच्या अभ्यागत कक्षात तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांमुळे नाशिकच्या पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याने ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता आयुक्त विश्वास नांगरे कोणत्या उपाययोजना करतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2019 12:43 am