नाशिक : अज्ञात चोरटय़ांकडून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र खेचून पलायन करण्याच्या घटना वाढत आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी मंगळसूत्र खेचून घेतले. पहिली घटना अंबड औद्योगिक वसाहतीलगत घडली. याबाबत महाजननगर येथील जिजाबाई पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.

जिजाबाई या उर्मिला जाधव आणि निर्मला वाणी या मैत्रिणींसोबत फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. रस्त्याने जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या चोरटय़ाने पाटील यांच्या गळ्य़ातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि मंगळसूत्र खेचून पलायन केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना भाभानगर परिसरात घडली. याबाबत योगिता कमोद यांनी तक्रार दिली. त्या रस्त्याने पायी जात असताना दुचाकीने आलेल्या चोरटय़ाने  सुमारे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेची ऑनलाइन फसवणूक

गुगल पे बंद करणे गरजेचे असल्याचे सांगून संशयितांनी बँक खात्याची माहिती मिळवीत यूपीआयच्या माध्यमातून एका महिलेच्या बँक खात्यातील ७३ हजार रुपये परस्पर ऑनलाइन लांबविल्याची घटना उघडकीस आली. १५ डिसेंबरच्या रात्री संशयितांनी महिलेशी संपर्क साधला होता. गुगल पे कंपनीतून बोलत असल्याचे भासवून त्यांनी गुगल पे खाते बंद करणे आवश्यक असल्याचे सांगून महिलेकडून बँकेच्या कार्डची आणि नंतर आलेल्या ओटीपी क्रमांकाची माहिती मिळवत यूपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातून ७३ हजार ३१८ रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.