नाशिक : क्षुल्लक कारणावरून व्दारका भागात दोन भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी लाकडी दांडके, बिअर बाटल्यांचा मुक्तहस्ते वापर झाला. यामध्ये दोघे भाऊ जखमी झाले. विक्की गवळी (महालक्ष्मी चाळ) या युवकाने तक्रार दिली. गवळी द्वारका येथील पेट्रोल पंपासमोरील ऑईल दुकान येथे उभा असतांना संशयितांनी त्याला गाठले. आम्हाला पाहून का हसतो? अशी कुरापत काढून मारहाण केली. यावेळी विक्कीचा भाऊ  किरण गवळी हा त्याच्या मदतीला धावला असता  संशयितांनी लाकडी दांडय़ासह गजाने दोघांना मारहाण केली. संशयितांनी शेजारील दुकानाजवळील लाकडी बाकडे उचलून दोघांवर फेकले. विक्कीच्या डोक्यात बिअर बाटली फोडण्यात आली. दोघा भावांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिंटू पवार (१९) आणि ऋत्विक चव्हाण (१९, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) यांच्याविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजमाध्यमातील मैत्रीतून फसवणूक

समाजमाध्यमावर मैत्री करत संशयिताने शहरातील व्यक्तीला भेटवस्तू पाठवत असल्याच्या भूलथापा देत त्याच्या बँक खात्यातून सव्वा लाख रुपये ऑनलाईन लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एल्सी बाबू (५३, अशोकनगर) यांनी तक्रार दिली. समाज माध्यमात चॅटिंगद्वारे संशयिताने बाबू यांच्याशी मैत्री केली. विदेशात राहत असल्याचे भासवले. २६ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगून कुरिअर कंपनीला पडताळणी करायची असल्याने त्या प्रक्रियेसाठी कुरिअरच्या पाठविलेल्या लिंकवर पीन क्रमांक सादर करण्यास सांगितले. या माध्यमातून संशयिताने बाबू यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून काही वेळात एक लाख २४ हजाराची रक्कम परस्पर लांबविली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन खरेदीच्या बहाण्याने ७० हजार रूपये लंपास

ओएलएक्स या संकेतस्थळावर वाहन विक्रीची केलेली जाहिरात एकाला चांगलीच महागात पडली. वाहन खरेदीच्या मोबदल्यात आगाऊ रक्कम देत असल्याचे भासवत संशयिताने बँक खात्याची माहिती घेऊन त्यातून ७० हजार रुपये ऑनलाइन लंपास केले. याबाबत चेतन परदेशी यांनी तक्रार दिली आहे. परदेशी यांच्या भावाने कंपनीचे वाहन विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. मागील महिन्यात संशयिताने त्यांच्याशी संपर्क साधला. आम्हांला वाहन आवडले असल्याचे सांगून व्यवहारापोटी आगाऊ रक्कम बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगितले. त्यामुळे परदेशी यांनी बँक खात्याची माहिती दिल्यानंतर ही फसवणूक झाली. संशयितांनी यूपीआय रिक्वेस्टच्या माध्यमातून बँक खात्यातून ७० हजाराची रोकड परस्पर लांबविली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.