सराफाकडील सहा किलो चांदीचे दागिने लंपास, खंडणीसाठी दमबाजी
शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी दिवसागणीक उंचावत असल्याचे दिसत आहे. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे अथवा पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास करण्याचे सत्र सुरू असताना नाशिकरोड भागात एका सराफी व्यावसायिकाकडील सुमारे सहा किलो चांदीची पिशवी चोरटय़ांनी खेचून नेली. दुसरीकडे खंडणीबहाद्दरांना पेव फुटले असून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितली जात असल्याचे काही प्रकार पुढे आले आहे.
खून, चोरी, टोळक्यांचा धुडगूस, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे, सिंहस्थात आलेल्या भाविकांची लुबाडणूक, वाहनांची चोरी, बंद घरे लक्ष्य करणे.. हा मागील काही महिन्यांतील घटनाक्रम. गुन्हेगारी घटना वाढत असुनही पोलीस यंत्रणा त्या रोखण्यात यशस्वी झाली नसल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांचे शहर अशी नाशिकची ओळख होती. मागील तीन वर्षांत ही ओळख पुसण्यात यंत्रणेला यश आले. तथापि, सध्याच्या गुन्हेगारी घटना पाहता नाशिकची पुन्हा त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची धास्ती सर्वसामान्यांना वाटते. जेलरोड परिसरात शुभलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक पाच किलो ८०० ग्रॅम चांदी पिशवीत घेऊन निघाले होते. दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी दागिन्यांची पिशवी हिसकावून पोबारा केला. दोन लाख १४ हजार रुपये इतकी त्यांची किंमत होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील एकाला भ्रमणध्वनीवर संशयिताने संपर्क साधला. मुलासह त्याला जिवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात तर खंडणीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हातगाडी लावण्यासाठी दरमहा एक हजार खंडणी द्यावी लागेल असे सांगून संशयिताने ५०० रुपये काढल्याची तक्रार एकाने दिली तर शेलार फार्मजवळील रस्त्यावर रिक्षा अडवून संशयिताने दरमहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा रिक्षा पेटवून देण्याची धमकी देत खिशातून ८०० रुपये काढून घेण्यात आल्याची तक्रार आहे. या प्रकरणी परस्परांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.