विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, आतापर्यंतच्या कारवायांमध्ये १५ लाख ५२ हजार ५५ रुपयांची रोकड पकडली गेली आहे. आचारसंहिता उल्लंघन  प्रकरणी १३ गुन्हे दाखल आहेत. अवैध शस्त्र, मद्यसाठा आणि इतर दाखल गुन्ह्य़ांची संख्या ५३६ आहे. १४ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. तर ७७ हजार ५४९ लिटर म्हणजे तब्बल ८० लाखहून अधिक रुपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क प्राप्तीकर विभाग आदी विभागांनी भरारी पथकांची स्थापना करून कारवाईला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाने निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तेव्हा लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भरारी पथकांच्या कारवाया कमी असल्याचे निदर्शनास आले. या कारवांमध्ये वाढ करण्याची सूचना आयोगाकडून दिली गेल्यानंतर भरारी पथके पुन्हा सक्रिय दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात आचारसंहिता भंग झाल्या प्रकरणी आतापर्यंत १३ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक पाच गुन्हे मालेगाव मध्य मतदारसंघात दाखल आहेत. निफाड आणि कळवणमध्ये प्रत्येकी तीन, बागलाण आणि इगतपुरीत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. उर्वरित नांदगाव, मालेगाव बाह्य़, येवला, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या मतदारसंघात आचारसंहितेचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. यासोबत अवैध शस्त्र बाळगणे, मद्य वाहतूक-विक्री आदींप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी ४८, ग्रामीण पोलिसांनी २३२, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५६ असे एकूण ५३६ गुन्हे दाखल केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिली. निवडणुकीत मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखविले जाऊ शकते. हे प्रकार रोखण्यासाठी झोपडपट्टी वा इतर परिसरात नजर ठेवली जात आहे.

मोठी रोकड बाळगणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत १५ लाख ५२ हजाराची रोकड जप्त करण्यात आली. यामध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात १० लाख ८३ हजार, देवळाली मतदारसंघात साडेचार लाख, मालेगाव बाह्य़ सहा हजार रुपये यांचा समावेश आहे. येवल्यात ४७० रुपये, निफाडमध्ये ८६० आणि मालेगाव बाह्य़मध्ये २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मद्याची अवैध वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क विभागाची पथके कार्यरत आहेत. पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.