घरफोडय़ांचे सत्र कायम

शहरात घरफोडीचे सत्र कायम असून वेगवेगळ्या भागांत झालेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरटय़ांनी दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. इंदिरानगर, सातपूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

पहिली घटना पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर येथील रो हाऊसमध्ये घडली. याबाबत कल्पेश पाटील यांनी तक्रार दिली. पाटील कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील १० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना अशोका मार्ग परिसरात घडली. याबाबत वाजीद मकसूद खान (सिदार हाईटस) यांनी तक्रार दिली. खान कुटुंबीय सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले असताना चोरटय़ांनी भरदिवसा त्यांचा आणि शेजारील बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ६५ हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. याबाबत प्रवीण सोन्स यांनी तक्रार दिली. सोन्स कुटुंबीय गुरुवारी सकाळी विदेशात जाणाऱ्या आईला सोडण्यासाठी मुंबई येथे गेले होते. चोरटय़ांनी दिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेस मारहाण

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणास्तव एकाने महिलेस घरात शिरून मारहाण केल्याची घटना जयभवानी रस्ता परिसरात घडली. कॅप्टन अनिल वर्मा (भालेराव मळा) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि तक्रारदार हे परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी महिलेने वर्मा विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. गुरुवारी पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून संशयिताने तिचे घर गाठले यावेळी त्याने माझ्या विरुद्ध पोलिसांत तक्रार देते काय, असे म्हणत शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेस मारहाण केली. तिच्या उजव्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदनाचे झाड लंपास

गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्सच्या आवारातून चोरटय़ांनी चंदनाचे झाड कापून नेले. याबाबत मधुकर सोळसे यांनी तक्रार दिली. चोरटय़ांनी दुपारी कोणी नसल्याची संधी साधली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तरुणीची आत्महत्या

जेलरोड भागातील २० वर्षांच्या तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. अर्चना शिंदे असे या युवतीचे नाव आहे.

राहत्या घरी तिने विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.