येवल्यात शेतकऱ्याविरुद्ध पोलिसांची कारवाई; पुरणगावाजवळ ३८ गाव पुरवठा योजनेतील जलवाहिनी फोडली

यंदा जिल्ह्य़ात दुष्काळाचे सावट असताना या स्थितीत पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबर दंड वसुलीचा बडगा उगारण्याची कारवाई सुरू झाली आहे. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फोडून शेतीसाठी पाणी पळविल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत संबंधितास सुमारे अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पुरणगाव शिवारातून जलवाहिन्यांद्वारे तालुक्यातील जळगाव नेऊर, मानोरी, नेऊरगाव, देशमाने या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या जल वाहिनीला पुरणगाव येथील ज्ञानेश्वर बाळकृष्ण ठोंबरे हा शेतकरी जोडणी घेऊन शुद्धीकरण केलेले पाणी चोरी करत असल्याचे ग्रामसेवक बी. के. कुशारे यांच्या निदर्शनास आले. जलवाहिनीतून हे पाणी विहिरीत सोडल्याचे उघड झाले. त्यामुळे या योजनेचे संबंधितांकडून पाणी चोरीचे मूल्य आणि जलवाहिनी फोडल्याने दोन लाख ३० हजार रुपये नुकसान झाल्याचे समितीने म्हटले आहे. सद्य:स्थितीत येवला तालुका भीषण टंचाईला तोंड देत आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांना या योजनेच्या माध्यमातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. साठवण तलावात केवळ ३० दिवस पुरेल इतकाच जलसाठा आहे. या परिस्थितीत संबंधित शेतकऱ्याने पाणी चोरी केल्यामुळे एका विभागाचा पाणीपुरवठा खंडित झाला. मागील चार दिवसांपासून जळगाव, नेऊर, मानोरी, नेऊरगाव, देशमाने या गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या प्रकरणी शेतकऱ्यांसह या कामात त्यास मदत करणारा वेल्डर, प्लंबर यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार येवला तालुका पोलिसात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व सचिव सतीश बागूल यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती समजल्यानंतर गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची चोरी करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा घटनेमुळे पूर्ण योजना बारगळू शकते. याबाबत समितीने प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी आणि जनतेला न्याय द्यावा, असे जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पी. आर. नंदनवरे यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील धरण परिसरातून या पद्धतीने अनधिकृत उपसा केला जात असल्याचे काही प्रकार मध्यंतरी उघड झाले होते. टंचाईच्या काळात पाण्याची सर्रास चोरी होत असल्याने अनेक भाग तहानलेले राहणार असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मनमाडच्या वाघदर्डी धरणालगत मध्यंतरी असाच प्रकार उघड झाला होता. त्या वेळी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई झाल्यामुळे पाणी चोरणाऱ्यांच्या कृतीला लगाम लागण्यास मदत होणार आहे.