23 October 2020

News Flash

डॉक्टरांची कमतरता..बंद वैद्यकीय उपकरणे.. मनुष्यबळाचा अभाव

येवल्यातील शासकीय रुग्णालयाची बिकट अवस्था, रुग्णालयातील परिस्थिती तातडीने सुधारण्याची आवश्यकता

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ात करोनाचे मालेगाव, नाशिक पाठोपाठ येवल्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ३३ रुग्ण आढळले आहेत. यात १२ रुग्ण हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागे शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, वैद्यकीय उपकरणे, सोयी सुविधांची वानवा आणि आवश्यक त्या दक्षतेचा अभाव अशी वेगवेगळी कारणे असल्याचे उघड होत आहे. रुग्णालयातील एकूण परिस्थिती सुधारण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे.

ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. परंतु, त्याच्या सेवेत आमुलाग्र बदल झाल्याचे अपवादाने दिसले. येवला हे राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर वसलेले असल्यामुळे अपघातातील जखमी ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुजबळ यांनी पाठपुरावा करून  शहरातील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांची मान्यता मिळवली. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. सध्या नव्या रुग्णालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होऊनही ग्रामीण रुग्णालयाच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही. सुस्थितीतील एक्स रे यंत्र अनेक वर्षांपासून बंद आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी उपकरण चार वर्षांपासून बिघडलेले आहे. रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाही. इतकेच नव्हे, तर शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. परिणामी, प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रियेची स्थिती निर्माण झाल्यास महिलेवर उपचार होत नाही. ऐनवेळी इतरत्र हलविताना रुग्णासह नातेवाईकांची दमछाक होते. आर्थिक भार पडतो तो वेगळाच.

मृतदेह ठेवण्यासाठीचे शीतगृह तांत्रिक बिघाडामुळे उपयोगी ठरत नाही. यातील पेटी थंड होत नसल्याने पार्थिव अधिक कालावधीसाठी ठेवता येत नाही. मनुष्यबळाचे प्रश्न वेगळेच आहे. गतकाळात ग्रामीण रुग्णालयास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या कंत्राटदाराने दोन विंधनविहिरी खोदून बांधकाम बरोबर रुग्णालयाच्या पाण्याची समस्या दूर केली. रुग्णालयाच्या बिकट अवस्थेमुळे अनेक रुग्ण मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी मोठय़ा संख्येने जातात. करोना संकट काळात मालेगाव येथे प्रसुती झालेल्या सुनेला बघण्यासाठी गेलेल्या सासूला करोना झाला. ही महिला येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात आली. उपस्थित डॉक्टर, परिचारिकांनी कोणतीही दक्षता न घेताच तपासणी केल्याने रुग्णालयातील १० जण बाधित झाले. करोनामुळे काही दिवस रुग्णालयच बंद ठेवावे लागले. रुग्णालयातील आणि इतर असे ३३ रूग्ण बरे झाल्याने अनर्थ टाळला. पण कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही.

आजही अनेक विभागात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. वैद्यकीय अधीक्षक देखील नाहीत. नव्याने आलेल्या सहाय्यक अधिक्षिका अल्प मनुष्यबळावर रुग्णालय चालवित असल्या तरी कामास मर्यादा येणे स्वाभाविक आहे. भुजबळांनी मतदारसंघातील कामांच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आपली यंत्रणा उभी केली होती. परंतु, रुग्णालयातील समस्यांकडे कोणीही लक्ष न दिल्याने करोना काळात रुग्णालय संकटात सापडले आहेत.

मनुष्यबळाचेही प्रश्न

काही वर्षांपूर्वी येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दर महिन्यात १०० हून अधिक प्रसुती होत असे. गेल्या वर्षी हे प्रमाण दीडशेपर्यंत होते. याचे कारण तत्कालीन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.पंकज पाटील यांनी दिलेली उत्तम सेवा मानले जाते. मात्र पाटील यांना मालेगावला प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. वर्षभरापासून ते तिथे काम करतात. येवला रुग्णालयात अनेक महिने स्त्री रोगतज्ज्ञ नव्हता. नंतर डॉ. मीना दामोदर यांची नेमणूक झाली. परंतु त्या सतत गैरहजर होत्या. यामुळे उपलब्ध परिचारिकांच्या भरवशावर प्रसूती होत असे. यावर बराच पाठपुरावा झाल्यानंतर महिनाभरापासून डॉ. मीना दामोदर या रुजू झाल्या आहेत. भूलतज्ज्ञ हेदेखील प्रतिनियुक्तीवर मालेगावला असतात. क्ष किरण तज्ज्ञ करारनामा संपल्याने मालेगाव येथे स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करतात. विवाह नोंदणी, एक्स रे यंत्राचे  तात्पुरते काम करणाऱ्यांस प्रतिनियुक्तीवर मालेगावला पाठविले गेले. बालरोग तज्ज्ञ नाही.  चांदवड येथील डॉक्टर रमाकांत सोनवणे आठवडय़ातून एकदा येत होते. पण करोना संकटामुळे तेही गेले १५ दिवसांपासून येत नाही. या स्थितीमुळे सर्वसामान्याला नाईलाजाने खासगी रुग्णालयाकडे जावे लागते.

येवले तालुका परिसरात ३२ रुग्णांना करोनाचा प्रादुर्भाव झाला असून १० रुग्ण आरोग्य विभागातील होते. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या सहा जणांना करोना झाला. ही सर्व आव्हाने स्वीकारून डॉक्टर, कर्मचारी पुन्हा सेवेसाठी सज्ज झाले आहेत. काही अपूर्णतेबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाते. येवल्याचे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज असून सेवा दिल्या जात आहेत. उपजिल्हा रुग्णालयात इतर आजारांवरील लसही उपलब्ध आहे. यापूर्वी केवळ खासगी दवाखान्यात महागडय़ा स्वरूपात मिळणारी लस आता  उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखून उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेचा लाभ घ्यावा.

– डॉ. शैलजा कुप्पास्वामी  (प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, येवला)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:29 am

Web Title: critical condition of the government hospital in yeola abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पोलिसांसाठी ‘फिव्हर क्लिनिक’
2 नाशिक, मालेगाव महापालिका लाल क्षेत्रात
3 खते, बियाणे, पीक कर्ज थेट उपलब्ध करणार
Just Now!
X