अनिकेत साठे

सहकार धुरिणांच्या विचारांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आदर्श बँकिंगची संकल्पना रुजविल्याचा दावा करणाऱ्या येथील विश्वास सहकारी बँकेच्या दोन शाखांचा कारभार बँकेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आप्तस्वकीयांच्या मालकीच्या जागेतून चालविला जात आहे. या कारभाराची रिझव्‍‌र्ह बँकेने गंभीर दखल घेऊन बँकेला डिसेंबर अखेपर्यंत या शाखा नव्या जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश केले आहेत.

२३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विश्वास सहकारी बँकेच्या ११ शाखा आहेत. स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्याकडे बँकेची संपूर्ण सूत्रे आहेत. बहुतांश बँका शाखा विस्तार करताना जागा खरेदी करण्याऐवजी भाडेतत्त्वावरील जागा घेण्यास प्राधान्य देतात. विश्वास बँकेनेही तेच केले, परंतु ते करताना अध्यक्षांशी संबंधित मिळकतींना झुकते माप दिल्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा आक्षेप आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने निर्देश दिल्यानंतर मात्र बँकेने अध्यक्षांशी संबंधित जागा सोडावी लागू नये म्हणून बरीच धडपड केली. भाडेतत्त्वावरील जागेचे प्राप्त प्रस्ताव, जास्तीच्या भाडय़ामुळे बँकेवर पडणारा आर्थिक भार आणि ग्राहकांचा स्थलांतरास असलेला विरोध अशी कारणे पुढे करण्यात आली. यासंबंधीचा चौकशी अहवाल रिझव्‍‌र्ह बँकेसमोर सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी स्पष्टीकरण देताना बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले, ‘‘संचालकांशी संबंधित नियमानुसार हा केवळ सावरकरनगर शाखेचाच विषय आहे. मुंबई नाका शाखा २००३ साली भाडय़ाने घेतली. तेव्हा ती ‘आरबीआय’च्या नियमानुसार नातेवाईकांशी संबंधित जागेत नव्हती. २००३चे करारपत्र २०१३ रोजी संपले. नंतर पुढील नऊ वर्षांकरिता म्हणजे २०१४ ते २०२३ या कालावधीसाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. तेव्हा ती मिळकत संबंधितांच्या आईचे निधन झाल्यामुळे वारसा हक्काने नावावर झाली. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ बँकेची स्थापना झाली तेव्हा दोन वर्षे कोणतेही भाडे वा अनामत रक्कम न घेता बँकेला जागा मोफत वापरण्यास दिली होती. बँकेच्या सावरकरनगर, मुंबई नाका या दोन्ही शाखा सध्या बाजारभावापेक्षा ५०० टक्केकमी दराच्या भाडेतत्त्वावर आहेत. ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक सूचनेनंतर बँकेने भाडय़ाने जागा मिळवण्यासाठी जाहिरात दिली होती. तेव्हा प्राप्त झालेले प्रस्ताव आणि सध्याचे भाडे यातील तफावत ‘आरबीआय’च्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. सध्या या दोन्ही शाखांसाठी मालकांना एक रुपयाही अनामत देण्यात आलेली नाही, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष वा संचालक यांनी जागा भाडय़ाने दिल्याची महाराष्ट्रातील अंदाजे ७० ते ७५ प्रकरणे ‘आरबीआय’कडे परवानगीसाठी सादर करण्यात आलेली आहेत. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. सहकार कायद्यात सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार देण्यात आले आहेत. या शाखांना वेळोवेळी सभेने एकमताने मान्यता दिली आहे. शाखा भाडय़ाने घेण्यामागे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही किंवा कायद्याचे उल्लंघनही झालेले नाही, असा दावाही ठाकूर यांनी केला.

सहा शाखा भाडेतत्त्वावरील जागेत

गेल्या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये विश्वास बँकेने एक कोटी ६० लाखांहून अधिक रुपयांचा नफा मिळवला. बँकेकडे दोन कोटी ६२ लाख रुपयांचा इमारत निधी आहे. बँकेच्या शहरात १० आणि ग्रामीण भागात एक अशा एकूण ११ शाखा आहेत. ११ पैकी सहा शाखा भाडेतत्त्वावरील जागेत, तर उर्वरित पाच शाखा मालकीच्या जागेत आहेत. सातत्याने अ वर्ग आणि प्रथमश्रेणी बँकेला मिळत आहे. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त कर्जवसुली, शून्य टक्के अनुत्पादित कर्ज (एनपीए) ही या बँकेची वैशिष्टय़े असल्याचा दावा बँकेकडून केला जातो.

प्रकरण काय?

* गंगापूर रस्त्यावरील ‘विश्व विश्वास पार्क’ या भव्य इमारतीत बँकेचे मुख्यालय आहे. तळमजल्यावरील अध्यक्षांच्या मालकीच्या जागेत बँकेची सावरकरनगर शाखा आहे.

* बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या इमारतीतील गाळे म्हणजे बँकेची मुंबई नाका शाखा आहे. बँकेच्या दोन शाखांचे कामकाज बँक अध्यक्ष किंवा त्यांच्या नातलगांच्या जागांमधून होत असल्याचे गेल्या वर्षी रिझव्‍‌र्ह बँकेच्या लक्षात आले होते.

* बँकेचे प्रतिनिधित्व करताना संचालकांनी काय करू नये, याविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा रिझव्‍‌र्ह बँकेने अधोरेखित केला होता.

* सावरकरनगर, मुंबई नाका शाखा नव्या जागेचा शोध घेऊन ३१ मार्च २०२० पर्यंत स्थलांतरित करण्याचे निर्देश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले होते. शिवाय, नव्या जागा घेताना मार्गदर्शक तत्त्वासंबंधीच्या परिपत्रकाचा अवलंब करण्याचे सूचित केले होते.

बँकेच्या ११ पैकी केवळ दोन शाखा संचालक आणि नातेवाईकांशी संबंधित आहेत. सावरकरनगर (१९९६) आणि मुंबई नाका शाखा (२००३) सहकार विभागाच्या पूर्वपरवानगीने भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या. ‘आरबीआय’चे परिपत्रक जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध झाले असल्याने तो नियम लागू होत नाही.

– विश्वास ठाकूर, अध्यक्ष, विश्वास सहकारी    बँक, नाशिक