नाशिक : जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिल्यामुळे काढणीवर आलेल्या द्राक्षांसह कांदा आणि अन्य पिकांची मोठी हानी झाली. बागलाण आणि दिंडोरीच्या काही भागात गारांचा अक्षरश: खच पडला. सिन्नरच्या पांढुर्ली भागात बागांमधून पाण्याचे लोट वाहात होते. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती द्राक्ष उत्पादक व्यक्त करीत आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडित होऊन अनेक भाग अंधारात बुडाले.

गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी त्र्यंबकेश्वर, सिन्नरच्या पश्चिम पट्टय़ात पावसाला सुरूवात झाली. पांढुर्ली, सोनांबे, कोनांबे भागात काही वेळात इतका पाऊस झाला की, शेतांमध्ये पाणीच पाणी साचले. बागलाण तालुक्यात सायंकाळी अकस्मात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षांव झाला. शेतात सर्वत्र गारांचा खच साचला. अंतापूर भागात शेती पांढरीशुभ्र झाली. मुल्हेर, ताहाराबाद, करंजाड, पिंगळवाडे, मुंगसे, जाखोड, वटार, केरसाणे परिसरात सौम्य गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून कांद्याची पात भुईसपाट झाली. हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा, आंबा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीटीची सर्वाधिक झळ द्राक्ष बागांनाह बसली. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, जानोरी, खेडगाव परिसरात गारांचा पाऊस झाला.

अन्य भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांची मोठी हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे करणार असल्याची माहिती सेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पावसाने द्राक्ष मण्यांना तडे जातात. अशी द्राक्षे स्थानिक बाजारात कोणी खरेदी करीत नाही. शिवाय ते मनुका बनविण्यासाठी घेतली जात नसल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी करोनामुळे प्रचंड नुकसान झाले होते. टाळेबंदीमुळे बागेतील तयार द्राक्षांना कोणी खरेदीदार मिळाले नव्हते. यंदा वाहतूक खर्च वाढल्याने निर्यातदार आणि व्यापारी कमी भावात माल खरेदी करीत आहे. सध्या देशांतर्गत बाजारासाठी २५ ते ३० रुपये किलो तर निर्यातक्षम द्राक्षांना ५० ते ७० रुपये किलोचा दर मिळाला. त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नसताना पावसाचा फटका बसल्याने द्राक्ष शेती कोलमडण्याची भीती बोराडे यांनी व्यक्त केली.

६० टक्के बागांची काढणी शिल्लक

जिल्ह्यात जवळपास एक लाख एकरवर द्राक्ष बागा आहेत. त्यातील ३५ ते ४० टक्के बागांमधील काढणी झाली आहे. उर्वरित ६० ते ६५ टक्के बागांमधून एकतर द्राक्ष काढणी सुरू आहे वा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ज्या भागात पाऊस झाला, तेथील बागांचे मोठे नुकसान झाले. पावसाने द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचा धोका आहे. निर्यातक्षम द्राक्षांना मूळ रंग कायम ठेवण्यासाठी प्रत्येक घडास कागद लपेटला जातो. पावसाने तो कागद धुवून काढला. गेल्या जानेवारीत अवकाळी पावसाने सटाणा तालुक्यात ३०० हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा अनेक भागात त्याची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे.

विजेचा लपंडाव

वादळी पावसामुळे शहर, ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. अकस्मात आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसह छोटय़ा विक्रेत्यांना बचावासाठी सुरक्षित जागा शोधावी लागली. वादळात झाडे, फांद्या पडून वीज यंत्रणेचे नुकसान होते. त्यामुळे वीज कंपनीकडून खबरदारीचा उपाय म्हणून काही भागात वीज पुरवठा बंद करण्यात आला. सायंकाळी तो पूर्ववत झाला. पण नंतर पुन्हा वीज गायब झाली. शहरासह ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.