अनिकेत साठे

उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. खरिपाची पिके जोमात वाढली. काही काढणीवर आली असतांनाच निसर्गाचे चक्र फिरले. डोळ्यांदेखत वेगवेगळ्या चरणातील कापूस, मका, सोयाबीन, केळी आदी पिके  उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी असेच नुकसान झाले होते.

विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र २१.१९ लाख हेक्टर आहे. सप्टेंबर अखेपर्यंत २०.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ९६.१२ टक्के पेरणी झाली. जून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंतचा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा होता. सप्टेंबरच्या मध्यानंतर स्थिती पालटली. सध्या तूर, भात, नागली ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मक्याला कणसे लागून ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनमध्ये शेंगा पक्व होण्याच्या मार्गावर आहे. मूग, उडीदचेही दाणे पक्व होत असून अनेक ठिकाणी काढणीची कामे सुरू आहेत. भूईमुगाच्या शेंगा पक्व होत आहेत. ज्वारी दाणे भरण्याच्या तर सूर्यफूल, कारळा फुलोरा अवस्थेत आहेत. तिळाची तशीच स्थिती आहे. वेगवेगळ्या चरणात असलेल्या पिकांना अखेरच्या टप्प्यात मुसळधार पावसाचा फटका बसला. तत्पूर्वी काही ठिकाणी सोयाबीनवर खोडमाशी, कापसावर गुलाबी बोंड अळी, रस शोषणाऱ्या किडींचा आणि पानावरील ठिपके रोगांचा, मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली. काही ठिकाणी कुजली. मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला.

दुष्काळी तालुक्यात अधिक पाऊस

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे म्हणून जे तालुके ओळखले जातात; तिथे यंदा पाऊस कमी आणि दुष्काळी तालुक्यांत अधिक झाला. काही भागात अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. भाजीपाल्यासह कांदा, मका, डाळिंबाचे नुकसान झाले. हवामानामुळे चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा खराब होत असताना खरीप कांद्याला बुरशीजन्य रोगाला तोंड द्यावे लागले. जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा, वाफ्यांमध्ये पाणी साचणे, अतिपाऊस, मध्यम तापमान यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढला. बुरशीमुळे रोपे कमजोर होऊन मान टाकतात. ओलाव्यामुळे मुळांची कार्यक्षमता बाधित झाल्याने मर रोगाचेही प्रमाण वाढले. जोडीला सूत्रकृमी, गोगलगायी, हुमवी या समस्यांमुळे कांदा उत्पादक हैराण आहेत. जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे प्रारंभी पिकांची स्थिती चांगली होती. अखेरच्या टप्प्यात सलग काही दिवस संततधार कायम राहिल्याने उडीद. मूग पीक वाया गेले. कापूस, मका सोयाबीन, ज्वारीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे रावेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर परिसरातील केळी भुईसपाट झाली. पपई, उसाची तीच अवस्था. जळगावमधील केळी उत्पादकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

धुळ्यात विक्रम

धुळे जिल्ह्यात अनेक वर्षांचे विक्रम मोडीत सरासरीच्या तुलनेत दीडपट अधिक पाऊस झाला. कापसाच्या एका झाडाला ७० पेक्षा अधिक बोंडे लागलेली होती. ती सर्व ओली होऊन पीक हातचे गेले. खेडे, कुसुंबा परिसरात कापूस, बाजरीचे नुकसान झाले. नंदुरबार जिल्ह्यात मंडलनिहाय जवळपास ७५ टक्के पावसाची नोंद झाली. परंतु, आठ दिवसांत जोरदार पावसाने पपई, ऊस, कापूस तूर आदी पिकांना फटका बसला. या एकाच जिल्ह्यात ११ हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे कमी-अधिक नुकसान झाले आहे. प्रभारी विभागीय कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी देखील उत्तर महाराष्ट्रात बरेच नुकसान झाल्याचे मान्य केले. काही ठिकाणी पावसाने मका, सोयाबीन आडवे झाले. शेतांत पाणी साचल्याने उडीदसह अन्य पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. धुळे, नंदुरबारच्या तुलनेत जळगावमध्ये अधिक नुकसान झाले. सध्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. पुढील तीन, चार दिवसांत पीकनिहाय नुकसानीची स्पष्टता होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.