हरितगृह, पोल्ट्री, कांदा चाळीचे नुकसान; २५१ घरांची पडझड

नाशिक : ‘निसर्ग’ चक्रीवादळात मनुष्यहानी टळली असली तरी जिल्ह्य़ातील १९१ हून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसात २१ हरितगृह, पोल्ट्री, गोठे, कांदा चाळींचे नुकसान झाले. २५१ घरांची पडझड झाली. तर ५६ जनावरांचा मृत्यू झाला.

कोकण किनारपट्टीला तडाखा देणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ बुधवारी रात्री नाशिक जिल्ह्य़ातून पुढे मार्गस्थ झाले. प्रवासात वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी सलग पाच ते सहा तास मुसळधार पाऊस कोसळला. वाऱ्याचा वेग आणि पावसाने शेतातील उभ्या पिकांबरोबर हरितगृह, पोल्ट्री, गोठे, कांदा चाळीचे नुकसान झाले. वादळाचा तडाखा बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू केले. त्यानुसार येवला, निफाड, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यात एकूण २१ हरितगृह, शेडनेट, पोल्ट्री, जनावरांचे गोठे आणि कांदा चाळीचे नुकसान झाले. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. दिंडोरीत कारले बाग जमीनदोस्त झाली. देवळाळी, भगूर भागातून मार्गस्थ झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नरला बसला. या तालुक्यात १३८.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नाशिक तालुक्यात ३८ हेक्टर, चांदवडमध्ये १.२, दिंडोरी १.६ आणि येवल्यातही काही नुकसान झाले. पेठ, त्र्यंबकेश्वर, निफाड, मालेगाव, नांदगाव, कळवण, सुरगाणा, बागलाण आणि देवळ्यात शेती पिकांचे नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. वादळी पावसाने घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. . जिल्ह्य़ात कच्च्या १८७ आणि पक्क्य़ा ६४ घरांचे अंशत: नुकसान झाले. सात झोपडय़ांचे नुकसान झाले. चक्रीवादळात ५६ जनावरांचा मृत्यू झाला. यात बागलाण तालुक्यातील ३६, कळवण आणि नाशिक प्रत्येकी पाच, येवला तीन, नांदगाव येथील दोन जनावरांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये दोन वाडे कोसळले

‘निसर्ग’ चक्री वादळामुळे जुने नाशिक परिसरात दोन वाडे जमीनदोस्त झाले. जिवीतहानी झाली नसली तरी नुकसान मोठय़ा प्रमाणावर झाले. सायंकाळनंतर जोरात वाहणारा वारा आणि पावसाने अक्षरश दाणादाण उडाली. जुने नाशिक परिसरात अनेक वाडे धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी स्थलांतर केले. काही कुटुंबांनी मात्र वाडा सोडला नाही. भद्रकाली परिसरातील पिंपळचौक येथे कृष्णा सांबरे आणि महेश मानसिंगानी यांच्या वाडय़ाचा काही भाग कोसळला. वाडय़ातून आम्ही नव्या घरी राहण्यासाठी गेलो असलो तरी या ठिकाणी जुने लाकडी सामान तसेच दुकानातील माल ठेवण्यात आला होता, असे सांबरे यांनी सांगितले. वादळी पावसाने वाडय़ाचे दरवाजे, भिंती कोसळल्या. सर्व माल, घरातील सामान ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने नुकसानीचा नेमका अंदाज लावता येत नाही. महापालिकेचे अधिकारी, पोलीस पाहणी करून गेले. आम्हांला नुकसान भरपाई हवी एवढीच मागणी असल्याचे सांबरे यांनी सांगितले. मानसिंगानी यांचे मेनरोडवर दुकान आहे. त्या दुकानाचे सामान त्यांच्या वाडय़ात होते. या वाडय़ाची भिंत धोकादायक असल्याचे महापालिकेच्या वतीने त्यांना दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.