नियमांकडे दुर्लक्ष

नाशिक : पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होईल, या भीतीच्या सावटामुळे सोमवारी शहरातील किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळून करोनाची नियमावली धाब्यावर बसवली गेली. मुळात गेल्या वर्षी टाळेबंदीत किराणा दुकानांसह जिवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना मुभा होती. नव्या संभाव्य टाळेबंदीत त्यावर प्रतिबंधाची शक्यता नसताना ग्राहकांनी शक्य तेवढा किराणा माल भरून घेण्यासाठी धडपड केली. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर, पूजा साहित्यासह मिठाई खरेदी उत्स्फुर्तपणे सुरू होती. सुरक्षित अंतर राखले गेले नाही. मुखपट्टीविना काही जण फिरत होते.

शासन, प्रशासनाने मुभा देऊनही सलग दोन दिवस बहुतांश किराणा मालाची दुकाने बंद राहिली होती. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात टाळेबंदी लागू करण्याचे संकेत मिळाल्यानंतर सोमवारी सकाळपासून किराणा, भुसार मालाच्या घाऊक, किरकोळ बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र चेंबरने सोमवारी सर्व दुकाने उघडणार असल्याचे म्हटले होते. तथापि, किराणा वगळता अन्य व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे मेनरोड, सराफ बाजार, भाडी बाजार, दहीपूल वा आसपासच्या भागात फ़ारशी वर्दळ नव्हती. किराणा मालाच्या रविवार कारंजा परिसरातील बाजारपेठेत मात्र विपरित चित्र होते. मुख्य किराणा बाजारासह उपनगरांमधील किराणा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली होती. या बाजारपेठेत सुरक्षित अंतर राखले गेले नाही. अनेक जण मुखपट्टीशिवाय वावरत होते. टाळेबंदी किती दिवस राहील, याची स्पष्टता नसल्याने अधिकाधिक किराणा भरून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. मागणी अकस्मात वाढल्याने त्याची परिणती किंमती वधारण्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहरात सुमारे पाच हजार किराणा दुकाने आहेत. घाऊक किराणा दुकानांची संख्या २२५ आहे. टाळेबंदीच्या भीतीमुळे सर्वच दुकानांत ही स्थिती निर्माण झाल्याचे किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. मुखपट्टी नसणाऱ्या ग्राहकांना माल दिला गेला नसल्याचा दावा त्यांनी केला. करोनाचे संकट भीषण स्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे या संदर्भात शासन जो निर्णय घेईल त्यास किराणा व्यापाऱ्यांचा पाठिंबा राहणार असल्याचे संचेती यांनी नमूद केले. दरम्यान, शहरी ग्राहकांप्रमाणे शेतकरी वर्गात टाळेबंदीविषयी धास्तीचे वातावरण आहे. मागील टाळेबंदीत सुरूवातीला काही दिवस कृषिमाल विकणे अवघड बनले होते. नंतर मागणीअभावी त्यास मातीमोल दर मिळाला. कांद्याची वेगळी स्थिती नव्हती. अखेरच्या टप्प्यातील द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. या अनुभवामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक शेतमाल विक्रीसाठी नेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह पेठ रोडवरील कांदा, बटाटा, धान्याच्या घाऊक बाजारात शेतकऱ्यांसह छोटय़ा विक्रेत्यांनी गर्दी केली होती.

‘महाराष्ट्र चेंबर’ला प्रतिसाद नाही

जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा शासन आदेश असला तरी राज्यातील व्यापारी सोमवारी सर्व दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उघडणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजने जाहीर केले असले तरी त्यास नाशिक शहरात प्रतिसाद मिळाला नाही. जीवनावश्यक वगळता अन्य कोणतीही दुकाने व्यापाऱ्यांनी उघडली नाहीत. करोनाचे संकट भीषण स्वरूप धारण करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन पाऊल उचलत आहे.

मागील टाळेबंदीत किराणा दुकाने सुरू होती. संभाव्य टाळेबंदीत त्यावर निर्बंध येणार नसताना ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

– कैलास जाधव (आयुक्त, महापालिका)