नाशिक : राज्य शासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने शहरात बुधवारच्या दिवशी सर्वाची लगबग दिसून आली. आपापल्या गावी परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानक गाठल्याने परिसर गजबजला. बस स्थानकातही नेहमीच्या तुलनेने बऱ्यापैकी वर्दळ होती. संचारबंदीतही किराणा दुकाने उघडी राहणार असल्याने किराणा दुकानांमध्ये गर्दी कमी राहिली.

बुधवारी रात्री आठपासून राज्यात संचारबंदी आणि कठोर निर्बंधांना सुरुवात झाली. संचारबंदीदरम्यान नेमके  काय सुरू आणि काय बंद राहील, याविषयी अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने आपापले नियोजन करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याने दिवसभर शहरात गजबज वाढली होती. अत्यावश्यक किराणा, भाजीपाला आणि अन्य काही सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सकाळीच दुकाने गाठली. परंतु दुपारनंतर किराणा दुकानांमधील गर्दी एकदमच कमी झाली.

शहरातील भाजी बाजारांमध्ये सायंकाळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सकाळीच खरेदी उरकून घेतली. कठोर निर्बंधांमुळे शहरात राहणे कठीण जाईल या भीतीने परप्रांतीय मजुरांनी कु टुंबासह गावचा रस्ता धरला. त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसर परप्रांतीय मजुरांमुळे गजबजला. मिळेल त्या रेल्वेने घरी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू राहिली. मागील अनुभव लक्षात घेता काहींनी सोबत शिदोरी म्हणून अन्न-धान्यही घेतले होते. काहींनी कोरडा शिधा सोबत घेतला होता. रेल्वे स्थानकाच्या तुलनेत बस स्थानकांवर गर्दी विरळ

राहिली. दरम्यान, दुसरीकडे प्रशासनाकडून संचारबंदी आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या क्षणापर्यंत नियोजन सुरू होते. पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत नाकाबंदीची तयारी सुरू होती.