News Flash

बँक व्यवस्थापकाकडूनच ग्राहकांची फसवणूक

अंबड येथील घटनेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कोटय़वधीचे कर्ज मिळवत बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले.

प्रतिनिधिक छायाचित्र

दुसऱ्या घटनेत बनावट कागदपत्राद्वारे कोटीचे कर्ज

शहर परिसरात पांढरपेशा वर्गही गुन्हेगारीत सहभागी होत असल्याचे दिसत आहे. पंचवटीतील घटनेत बँक अधिकाऱ्याने ग्राहकांना लाखोंचा गंडा घातला, तर अंबड येथील घटनेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कोटय़वधीचे कर्ज मिळवत बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येथील इंद्रकुंड परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेत रमेश अमृतकर (५८) यांचे खाते आहे. संशयित अंकुश छाबरा बँकेचा व्यवस्थापक असताना त्याने २७ जुलै २०१५ ते २१ एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करत वेगवेगळ्या खातेदारांच्या खात्यातून रक्कम परस्पर स्वत:च्या व आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करत खातेदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संशयित छाबराने विविध खातेदारांच्या खात्यातून ४३ लाख ८२ हजार रुपये वळते करून फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यावर खातेदारांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी बँकेत जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खातेदारांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून अनेकांनी बँकेत धाव घेत खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या घटनेत बँकेची फसवणूक करण्यात आली. अंबड औद्योगिक वसाहतीतील कॉपरेरेशन बँकेच्या शाखेत संशयित लीना मोरे, अनिल मोरे, राजेश मोरे यांनी १३ डिसेंबर २०१४ ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केले.

यापूर्वी संशयितांनी अन्य बँकेकडून कर्ज घेतल्याने त्यांना कॉपरेरेशन बँकेकडून कर्ज मिळविण्यात अडचणी येत होत्या. हे कर्ज मिळवण्यासाठी संशयितांनी आपली मिळकत गहाण ठेवली, मात्र गहाण ठेवलेल्या मिळकतीचे खोटे सात-बारा उतारे तयार केले. ते खरे असल्याचे भासवत कर्जासाठी तारण म्हणून बँक अधिकाऱ्यांकडे दिले. दरम्यान, कागदपत्रे पाहता संशयितांनी मागणी केलेले एक कोटी १२ लाख ११ हजार ७६७ रुपयांचे कर्ज मंजूर झाले. हा प्रकार बँकेच्या उशिरा लक्षात आला. या प्रकरणी बँकेने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:04 am

Web Title: customer cheated by the bank manager
Next Stories
1 २३० कोटींचा गोदा प्रकल्प आराखडा मंजूर
2 संजय निरुपम यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन
3 जीवनदायी आरोग्य योजनेचा ९० हजार रुग्णांना लाभ
Just Now!
X