X

सजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ

बाप्पाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर आले असून स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे

थर्माकोल बंदीचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही फटका; मूर्ती खरेदीस चांगला प्रतिसाद

बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वाना लागलेले असतांना त्याच्या स्वागताच्या तयारीनेही वेग घेतला आहे. सजावटीच्या सामानाने बाजारपेठ फुलली असली तरी थर्माकोल बंदीमुळे ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही फटका बसला आहे. मूर्ती खरेदीस प्रतिसाद असताना सजावटीच्या सामानासह मखर तसेच मंदिर खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.

बाप्पाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर आले असून स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. मोती, हिरे आणि फुलांचे विविध आकर्षक दागिने, माळांसह आकर्षक लाकडी, कागदी मखरांनी बाजारपेठेत रंग भरले आहेत, परंतु ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी हा रंग फिका पडतो की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने उत्सवातील सजावटीला मर्यादा आल्या आहेत. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. थर्माकोलला पर्याय शोधण्यात विक्रेत्यांना पुरेसा वेळच मिळाला नाही. प्लायवूड, बांबूची चटई, कागद, पुठ्ठा, रंगीत कागद, रंगीत कपडे, लेस, कुंदन, मणी, मोती आदींच्या मदतीने आकर्षक मखर आणि मंदिरे करण्यात येत आहेत. हे सर्व काम हस्तकलेवर आधारित असून कुठल्याही यंत्राचा यासाठी आधार घेण्यात आलेला नाही. पर्यायाने मंदिरे आणि मखर तयार करण्यात अडचणी आणि मर्यादा येत आहेत. कागदी पुठ्ठा आणि प्लायचा वापर करीत तयार केलेली मंदिरे साधारणत: २०० ते  हजार रुपयांच्या घरात आहेत. तसेच कापड, पडदे, मोतीकाम, नक्षीकाम केलेली पर्यावरणपूरक मंदिरे साधारणत: हजार रुपयांपासून पुढे विक्रीसाठी आहेत. ग्राहकांच्या घरातील जागा, तयार केलेली मखरे, मूर्तीचा आकार, किंमत याचा ताळमेळही काही ठिकाणी बसत नाही. या सर्वाचा परिणाम विक्रीवर झाला असून ग्राहकांच्या खिशालाही त्याची झळ बसत आहे मखर विक्रेते आशुतोष आंबेकर यांनी प्लाय तसेच चटई आदींच्या साहाय्याने मंदिरे आणि मखर तयार केली असून तीन लाखांच्या वर भांडवल गुंतवून अद्याप तीन रुपयेही हातात आलेले नसल्याचे सांगितले. ग्राहक थर्माकोल बंदीमुळे संभ्रमात आहेत. खिशाचा अंदाज घेत पट्टी आणि डझनभर फुले घेऊन ते निघून जातात. यामुळे मंदिर, मखर बनविण्यासाठी आलेला खर्चही विक्रीतून निघतो की नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. रश्मी वाखारकर यांनीही  ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद अद्याप लाभलेला नसल्याचे सांगितले. शनिवारी किंवा रविवारी, गणपती बसविताना जी खरेदी होईल त्यातून चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

सजावटीची दुकाने

बाप्पाच्या सभोवतालची आरास आकर्षक दिसावी यासाठी कापडी फुले, पाने, वेली, फुलांचे रंगीत चेंडू, मणी आणि मोत्यांच्या माळा असे विविध पर्याय बाजारपेठेत ग्राहकांसाठी खुले आहेत. माळींसाठी ९० रुपयांपासून पुढे किमती आहेत. फुलांची विक्रीही ९० रुपये डझनाने सुरू आहे. पर्यावरणपूरक मंदिराच्या किंमती पाहता फोमची सहा फुटाची पट्टी साधारण ४० रुपये आणि एक मीटर ५० रुपये या दराने होत आहे.

First Published on: September 7, 2018 4:39 am
Outbrain

Show comments