19 December 2018

News Flash

समाज माध्यमांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर फ्रेंड’

समाज माध्यमांच्या मदतीने आपले सावज हेरत आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

सायबर गुन्ह्यंमध्ये अल्पवयीनांचे प्रमाण चिंताजनक

नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून मैत्रिणीला अभ्यासाच्या बहाण्याने घरी बोलवत तिच्यावर अतिप्रसंग करणे, तरुणीला फेसबुकवर अश्लील छायाचित्र पाठवत धमकी देणे.. आदी समाजमाध्यमांतर्गत घडणारे प्रकार चिंताजनक असून यावर नियंत्रण यावे यासाठी शहर पोलिसांच्यावतीने ‘सायबर फ्रेंड’ ही संकल्पना कार्यान्वित केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे.

समाज माध्यमांच्या मदतीने आपले सावज हेरत आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. या स्थितीत आता या माध्यमाचा वापर करत अल्पवयीन मुला-मुलींचा विशिष्ट गट यामध्ये सक्रिय झाला आहे. १३ ते १९ या वयोगटातील मुले-मुली नवमाध्यमांचा गरजेपेक्षा अधिक वापर करीत असून सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीचा गैरवापर करण्याकडे तो झुकत आहे. नव माध्यमांवर विशिष्ट ग्रुप तयार करत त्यावर अश्लील संदेशाची देवाणघेवाण करत मुला-मुलींना एकत्र आणायचे, त्यांचे अश्लील छायाचित्र काढायचे किंवा त्या विशिष्ट प्रसंगाचे चित्रीकरण करत तिला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत या अल्पवयीन गटाची मजल गेली आहे.

काही वेळा व्हॉट्सअ‍ॅपवर आपले स्टेट्स सतत अपडेट ठेवणाऱ्यांकडून माहिती जमवत त्यांच्या घरातील मौल्यवान साहित्य चोरणे, मित्र मैत्रीणींची खासगी माहिती जमवत त्याचा गैरवापर करणे असे प्रकार शहरात सुरू आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पेतून सायबर क्राईमविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यात प्रथमच ‘सायबर क्लब’ची संकल्पना राबविली गेली.

शाळा-महाविद्यालयांमध्ये सायबर फ्रेंड्स हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत कार्यशाळा, व्याख्यानाद्वारे समाज माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, त्याचे धोके, गैरवापराने होणारे दुष्परिणाम आदींबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांना थेट पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रारी करण्यास सांगितले गेले.

गेल्या दोन वर्षांत या क्रमांकावर ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४०० तक्रारींचे निवारण करण्यात आले. तसेच ३६ गुन्हे दाखल असून त्यात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवरून अश्लील भाषेचा वापर, विनयभंगाच्या तक्रारी अधिक आहेत. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा असणारा सहभाग चिंताजनक असल्याचे सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले. अनेकदा एकमेकांचा वचपा काढण्यासाठी या माध्यमाचा वापर होत असल्याचे लक्षात येते. यासाठी शाळा, महाविद्यालयात कार्यशाळा, व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असल्याचे त्यांनी सूचित केले.

पालकांनी सजग होण्याची गरज

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात नवमाध्यमांचे विशेषत भ्रमणध्वनीचे लोण पोहचलेले नाही. त्यामुळे त्यांना आजही अभ्यास किंवा आपल्या वैयक्तिक अडचणी भेडसावत आहेत. तुलनेत शहरात प्रत्येकाच्या हाती भ्रमणध्वनी असून पालकच लहान मुले किंवा किशोरवयीन मुला-मुलींच्या हातात त्यांना हव्या असणाऱ्या माहितीसाठी तो वापराचा सल्ला देत असल्याने मुलांवर अंकुश कसा ठेवणार? पालकांनी भ्रमणध्वनी हातात दिल्यामुळे मुले त्याचा वापर कसा करतात याकडे पालकांचे लक्ष नाही आणि त्यातून कधी कधी विचित्र प्रसंग उद्भवतात. मुलांमध्ये मानसिक व शारीरिकदृष्टय़ा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. याविषयी पालकांनी सजग होणे गरजेचे आहे.

– डॉ. नीलेश जेजुरकर, मानसोपचारतज्ज्ञ

First Published on November 14, 2017 3:08 am

Web Title: cyber friend to prevent crime in social media