माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार देशात वेगाने वाढत असताना दुसरीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही स्वतंत्र सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरु करणार असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली.

पोलीस आयुक्तालयात सिनिअर जर्नलिस्ट फोरमसह झालेल्या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, गुन्ह्यांची उकल अशा विविध मुद्यांवर सिंघल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तसेच सोशल माध्यमांशी संबंधित विविध प्रकारचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील सायबर गुन्हे अधिक प्रमाणात उघडकीस आणण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सिंघल यावेळी म्हणाले.

वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त जयंत बजबळे यांनी यावेळी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शहरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम व मोहिमांची माहिती दिली. या बैठकीत झालेल्या चर्चेमधून वाहतुकीच्या विविध समस्यांवर उपाय योजनांबाबत सूचना करण्यात आल्या. हेल्मेट वापरासंबंधी करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे शहरातील निम्म्यापेक्षा जास्त नागरिक हेल्मेटचा वापर करत असल्याचे सिंघल यावेळी म्हणाले. विविध प्रकारची कारणे सांगून महिला व महाविद्यालयीन तरुणींकडून हेल्मेटचा वापर टाळला जात असल्याचे यावेळी सिंघल यांनी म्हटले.