एका घरासह चार दुकाने भस्मसात

सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा महामार्गावर मंगळवारी पहाटे नायट्रोजन सिलिंडर घेऊन निघालेली मालमोटार अपघातग्रस्त झाल्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका घरासह चार दुकाने भस्मसात झाली. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी अवघे सटाणा शहर दणाणून गेले.

सुरतहून पुण्याकडे नायट्रोजनचे सिलिंडर घेऊन मालमोटार निघाली होती. पहाटे साडे पाचच्या सुमारास सटाणा शहरातील व्हिपीएन महाविद्यालयाजवळ दुभाजकावर ती आदळली आणि एका सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे कंटेनरला आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. मालमोटारीवरील सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने तासाभरात सहा सिलिंडरचे स्फोट झाले. यामुळे आगीने लगतच्या तुकाराम सोनवणे व्यापारी संकुलास वेढले. याच वेळी शिवाजी पाटील यांच्या घराला आग लागली. स्वयंसेवकांनी तातडीने प्रयत्न करून त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढले. जवळपास दीड तास अग्नितांडव सुरू होते. सटाणा अग्निशमन दल आणि स्थानिक गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सिलिंडरचे स्फोट इतके भीषण होते की, आसपासच्या दोनशे मिटरवरील घरांचे तावदाने फुटली. सोनवणे संकुलातील चार दुकाने जळून खाक झाली. आगीचे भीषण स्वरुप लक्षात घेऊन या महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे जवळपास दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. संतप्त नागरिकांनी या महामार्गावरील वळण रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.