नाशिकमध्ये ६.५ तर निफाड ५.४ अंश तापमान

नाशिकचा पारा दिवसेंदिवस खाली खाली सरकू लागला असून मंगळवारी तो ६.५ वर आल्याने नाशिककर कुडकुडू लागले. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वेगाने वाढत असून सर्वसामांन्यापासून शेतक-यांना या थंडीने गारठले आहे. विशेषत रात्रपाळीला काम करणारे कर्मचारी, सकाळच्या सत्रात शाळेत जाणारे विद्यार्थी व शिक्षक, वृत्तपत्र विक्रेते, दुध वितरक यांना या थंडीच्या तडाख्याला तोंड द्यावे लागत आहे. गोदावरी व जिल्ह्यातील इतर नद्यांच्या किनारी राहणाऱ्या नाशिकरांना तीव्र थंडीला तोंड द्यावे लागले. देशात व राज्यात देखील विविध ठिकाणी कमालीची थंडी पडली असून उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांनी नाशिककरांना गारठले आहे. या वातावरणामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून शेतक-यांनाही थंडीचा फटका बसला आहे. नाशिकच्या द्राक्षांसह इतर पिकांवरही थंडीचा परिणाम पहावयास मिळत आहे.

आज दिवसभर शहरात गारवा चांगलाच जाणवत होता. काही ठिकाणी थंडीमुळे चहाचा आस्वाद घेणारे नागरिक दिसत होते. तर काही ठिकाणी शेकोट्यांद्वारे ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. दुपारच्या दरम्यान सूर्याच्या उष्णतेचा आधार काही जण घेताना दिसून येत होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे तापमान आज ५.४  अंशांपर्यंत घसरल्याने तेथील शेतक-यांसह सर्वसामान्यांना प्रचंड थंडीला तोंड द्यावे लागले. तेथील द्राक्ष बागायतदारांनाही या थंडीची झळ गेल्या २ महिन्यापासून सोसावी लागत आहे. तेथील द्राक्षमण्यांना भुरी सारख्या रोगांची लागण झाली असून द्राक्षमण्यांना काळे डाग पडत आहेत. थंडीमुळे नागरिक महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडत असून कार्यालयीन काम आटोपल्यावर कर्मचारी देखील घरची वाट धरत आहेत. व्यापारी वर्गदेखील देखील नेहमीच्या वेळेपूर्वी आपली दुकाने बंद करत आहेत. झोपडीत राहणाऱ्या गरीब वर्गाला थंडीचा कमालीचा फटका बसला आहे.