वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात वीजपुरवठा खंडित होणे समजण्यासारखे आहे. तथापि, शहरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, उद्योगांसह ऑनलाइन शिक्षणावर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. कुठे अर्धा तास वीज गायब होते तर पंचवटीतील अमृतधामसारख्या परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. कधी पाच मिनिटांत पुरवठा सुरळीत होतो तर कधी तासभर प्रतीक्षा करावी लागते. वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी महावितरणने व्यापक स्वरूपात पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा केला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वीज कंपनीने युध्दपातळीवर काम करत पुरवठा सुरळीत केल्याचे ताजे उदाहरण आहे. वादळी पावसात वीजपुरवठा खंडित होणे नवीन नाही. परंतु, पाऊस नसतानाही वारंवार वीज गायब होण्याचे नेमके  कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणत्या भागातील वीज कधी गायब होईल हे कोणालाही सांगता येत नाही. मध्यवर्ती बाजारपेठेचा परिसर असो की, निवासी भाग. सर्वत्र या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे कारणही महावितरणकडून नागरिकांना देता येत नाही.

एरवी शनिवारी दिवसभर वा काही तास वीजपुरवठा खंडित राहणार असेल तर कंपनी ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवते. वीज खंडित होण्याचे इतके प्रकार सध्या घडतात, पण त्याचे कारण लक्षात येत नसल्याचे ग्राहक सांगतात. त्याचा कोणताच आगाऊ संदेशही आता भ्रमणध्वनीवर येत नाही.

पंचवटीतील अमृतधाम हा निवासी वसाहतीचा परिसर. या भागात असा एकही दिवस नाही की वीज गायब होत नाही. खंडित वीजपुरवठा कधी अध्र्या तासात सुरू होतो. अनेकदा तो तासापेक्षा अधिक वाट बघायला लावतो. अन्य भागात खूप वेगळी स्थिती आहे, असे नव्हे. महात्मा गांधी रस्ता, रविवार कारंजा, मेनरोड या व्यापारी पेठेत व्यावसायिक ग्राहक आहेत. ढगाळ वातावरण झाले तरी वीजपुरवठा खंडित होतो. टाळेबंदीचे र्निबध शिथिल झाल्यामुळे ग्राहक बाजारात गर्दी करत आहेत. इलेक्ट्रॉनिक, भ्रमणध्वनी, इलेक्ट्रिकलच्या साधनांच्या दुकानात वीजपुरवठा नसल्यास ग्राहकांना वस्तू दाखविणे अवघड होते. ढगाळ वातावरणात अंधार दाटलेला असतो. दुपारी दुकानांमध्ये दिवे सुरू ठेवले जातात. पण, वीज सारखी खंडित होत असल्याने वारंवार अंधारात बसावे लागते.

एरवी संततधार सुरू असली तरी वीजपुरवठा कायम रहायचा. मात्र मागील काही दिवसांत तसे घडत नाही. मुसळधार पावसाची चिन्हे दिसली तरी वीजपुरवठा बंद होतो. वादळी वाऱ्यात वीज तारांवर झाडे पडणे वा वीज खांब कोसळून अडचणी येणे स्वाभाविक आहे. निसर्ग चक्रीवादळावेळी शहर मंडळात अनेक वीज खांब जमीनदोस्त झाले होते. वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद करावा लागला. अनेक उपकेंद्र बंद पडली होती. तेव्हा वीज कंपनीने युध्दपातळीवर काम करून पुरवठा सुरळीत केला.

पावसाळ्याआधी वीजपुरवठय़ात अडथळे येऊ नये म्हणून शहरात कामे झाली. त्याचा प्रत्यक्षात कुठे लाभ झाला हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. मध्यंतरी शून्य विद्युत अपघातासाठी परिमंडळात साडेपाच हजारहून अधिक विद्युत रोहित्र, वितरण पेटीची झाकणे बंद, दुरुस्त केली होती. देखभाल, दुरुस्ती नियमित होत असेल तर वीज जाण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

काही दिवसांत अनेकदा विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. विजा चमकतात, तेव्हा व्यवस्थेचे नुकसान होऊ नये म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागतो. कधी कधी कुठे काही दुरुस्ती, देखभालीची कामे सुरू असतात. शहरात काही ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. त्यावेळी पुरवठा खंडित करावा लागतो. पावसाळ्याआधी कंपनीने वीज तारांवरील फांद्या हटविण्याचे काम केले होते. अडीच, तीन महिन्यांत या झाडांच्या फांद्या पुन्हा तारांजवळ पोहोचल्या. यामुळे त्या कोसळून तारांवर पडतात. वीजपुरवठा खंडित होतो. प्रत्येक ठिकाणची अडचण वेगळी असते. कधी काही काम सुरू असते. कधी खांब बदलला जात असतो. शनिवारी देखभाल दुरुस्तीची कामे करण्याआधी ग्राहकांना लघूसंदेशाद्वारे आगावू कल्पना दिली जाते. शहरात सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

– महावितरण