रत्नागिरी जिल्ह्यात सध्या असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहोराला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिग जिल्हात हंगामपूर्व द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
बागलाण तालुक्यात सुमारे ६०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेवग्यालाही अवकाळीचा फटका बसला. हंगामपूर्व द्राक्ष वगळता अन्य बागांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही बागांमध्ये आंबा फळ कणीतून वाटाणा आकारात येण्याची अवस्था आहे. मात्र अवकाळी पावसामुळे मोहोरावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे फळावर काळे डाग पडून दर्जा घसरण्याची शक्यता असते. तसेच बुरशी पडल्याने मोहोर गळण्याचा धोका आहे. प्रसिद्ध आंबा बागायतदार तुकाराम घवाळी यांनी सांगितले की, गेले आठ दिवस वातावरण खराब आहे. सोमवारी मोठा पाऊस झाला आहे. या हवामानामुळे मोहोरावर विपरीत परिणाम होईल. आधीच थंडी नसल्याने आंबा पीक अडचणीत आहे. तुडतुडा मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे फवारणीचा खर्च वाढलेला आहे.
सांगलीत पिकांवर परिणाम
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला, द्राक्षावर बुरशीजन्य करपा, दावण्या रोग बळावण्याची भीती आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 12:21 am