19 January 2021

News Flash

जिल्ह्य़ातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच

छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

संग्रहित

छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

नाशिक : गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्य़ातील पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जाऊ देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावले.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना उर्ध्व कडवा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत भुजबळ यांनी मार्गदर्शन के ले. या वेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेचे राजेश मोरे आदी उपस्थित होते.

कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी, तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पूर्णपणे वापर झाला असल्याने शासनाने औरंगा, अंबिका, नार-पार, दमणगंगा, उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत केला. त्यानुसार १९ प्रवाही वळण योजनेद्वारे २३२१ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक जिल्ह्य़ातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना असून याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील ६९०.१६ दशलक्ष घनफूट/ १९.५४ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करून शासनाला सादर करण्याची सूचना मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या अधिकाऱ्यांना या वेळी भुजबळ यांनी केली.

वैतरणा धरणाचे एक टीएमसी पाणी मुकणेत वळविणार

वैतरणा धरण पूर्णपणे भरल्यानंतर सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीता पडून अरबी समुद्राला जाऊन मिळत असल्याने उर्ध्व वैतरणा-मुकणे धरण प्रवाही वळण योजनेंतर्गत उर्ध्व वैतरणा धरणाच्या सॅडल डॅमद्वारे एक टीएमसी पाणी मुकणे धरणात वळविण्यात येण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  वैतरणा धरणासाठी अतिरिक्त संपादित झालेल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भूसंपादनाबाबत जमीनमालकांशी चर्चा

इगतपुरी तालुक्यातील घोरपडेवाडी गावाजवळ उर्ध्व कडवा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत ८६० मीटर लांबीचे आणि २१.८० मीटर उंचीचे मातीचे धरण प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीत धरणाच्या बुडीत क्षेत्राचे सर्वेक्षण आणि सीमांकन, भांडारगृह, चौकीदार निवासस्थान, धरणाकडे जाणारा रस्ता आदी कामे पूर्ण झाली असून बुडीत क्षेत्र, धरण पायाच्या बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध आहे. त्यामुळे उर्ध्व कडवा प्रकल्पाच्या भूसंपादनाची समस्या जमीनमालकांशी चर्चा करून सोडविण्याच्या सूचना भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 1:57 am

Web Title: dams water of nashik district only for maharashtra says chhagan bhujbal zws 70
Next Stories
1 कांदा दरात २५० रुपयांनी घसरण
2 सैनिकीशाळेत दहावीतील गुणांनुसार प्रवेश
3 करोना रुग्णांच्या देखभालीची जबाबदारी नातेवाईकांवरच
Just Now!
X