महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पुलांची नियमित तपासणी, देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विभागनिहाय पूल मंडळांतर्गत स्वतंत्र विभाग व उपविभाग स्थापन केले जात आहे. त्या अंतर्गत नाशिक येथे ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच हा विभाग कार्यान्वित होत आहे. या विभागावर जिल्ह्यातील लहान-मोठय़ा तब्बल १०३९ पुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे.

ऑगस्टमध्ये पोलादपूरजवळील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जाग आलेल्या शासनाने खबरदारीच्या दृष्टिकोनातून तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व पुलांची तपासणी करण्यापासून ते ब्रिटिशकालीन धोकादायक पुलांवर खडा पहारा तैनात करण्यापर्यंतचे निर्देश दिले गेले. याव्यतिरिक्त पावसाळ्यात महत्त्वाचे पूल व इमारतींच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापक नेमण्याचे निश्चित झाले. या घडामोडी सुरू असताना राज्यातील हजारो किलोमीटर लांबीच्या मार्गावरील लहान-मोठय़ा १६ हजार ८५ पुलांची देखभाल व दुरुस्ती, त्यांची नियमित तपासणी या महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे समोर आले. बांधकाम विभागाची राज्यात सहा प्रादेशिक विभागात मुख्य अभियंत्यांच्या अधिपत्याखाली रस्ते व पुलांची नवीन बांधकामे, अस्तित्वातील रस्ते व पुलांची दुरुस्ती, अस्तित्वातील पुलांचे परीक्षण व तपासणी ही कामे हाताळली जात होती. बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची व पुलांची कामे, अन्य बांधकामे तसेच अन्य विभागांनी सोपविलेली इमारतींची बांधकामे हाताळताना पुलांची नियमित तपासणी विहित कालावधीत पार पाडता येत नसल्याचे समोर आले.

या पाश्र्वभूमीवर, ब्रिटिशकालीन पूल आणि इतरही सर्व पुलांचे नियमित सर्वेक्षण, संरचनात्मक व बांधकाम, सद्य:स्थितीविषयक तपासणी, परीक्षण आणि नवीन पुलांची बांधकामे यासाठी समर्पित स्वरूपात प्रादेशिक विभाग, उपविभाग अस्तित्वात आणण्याची गरज लक्षात आली. त्या अनुषंगाने नाशिक येथे स्वतंत्र विभाग स्थापन होत असल्याची माहिती नाशिक बांधकाम विभागाचे प्रमुख हांडे यांनी दिली. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तुलनात्मक कमी कार्यभार असलेल्या कार्यालयावर समर्पित पूल कार्यालये म्हणून सद्य:स्थितीत कोणतीही नवीन पदनिर्मिती अथवा नवीन कार्यालय न करता तसेच नव्याने कोणताही आर्थिक भार पडू न देता ही व्यवस्था ही व्यवस्था करण्यात येत आहे. संबंधित विभागावर केवळ पुलांशी संबंधित देखभाल व दुरुस्ती, तपासणी, नव्या पुलांची बांधणी ही जबाबदारी राहणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बांधकाम विभागात बीओटी आणि कृषी या उपविभागांकडे कोणतीही कामे नाहीत. त्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचा वापर नव्या पूल विभागात करण्यात करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यतील स्थिती

  • रस्त्यांची एकूण लांबी – ६७८० किलोमीटर
  • मोठे व लांब पूल – १४५
  • ब्रिटिशकालीन पूल – ९
  • लहान पूल – ८९४