14 December 2017

News Flash

स्वाइन फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष धोकादायक

सोमवारी शासकीय विश्रामगृहात स्वाइन फ्लुचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: March 21, 2017 4:26 AM

Girish Mahajan: येत्या १५ दिवसांच्या आत डॉक्टरांच्या रक्षणासाठी ११०० रक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे ते म्हणाले.

 

गिरीश महाजन यांचा इशारा

मागील तीन महिन्यात जिल्ह्यात २१ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांना घरी पाठविण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात चार संशयित रुग्ण आहेत. स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवावा तसेच या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याने नागरिकांना याबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

सोमवारी शासकीय विश्रामगृहात स्वाइन फ्लुचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, अपूर्व हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते. महाजन यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षांची माहिती घेतली. स्वाइन फ्लू आजारावर प्राथमिक लक्षणे दिसताच उपचार करणे गरजेचे असल्याने याबाबत खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांची माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात यावे. आठवडा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना तसेच रुग्णालय तपासणी धडक मोहिमेबाबत माहिती दिली. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस. पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी स्वाइन फ्लू रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती दिली. जिल्ह्य़ात या वर्षी आतापर्यंत २१ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. ताप, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, तीव्र घसादुखी आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरितजवळील रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

First Published on March 21, 2017 4:26 am

Web Title: dangerous to ignore the symptoms of swine flu says girish mahajan