24 January 2021

News Flash

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी नांदुरी ऐवजी आता सप्तश्रृंग गडावर दर्शन पास

राज्य शासनाने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

घाट मार्गावरील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी बदल

वणी : सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नांदुरी घाट रस्त्याच्या कमानीजवळील टोल प्लाझा येथे भाविकांना श्री भगवती दर्शन पास देण्याच्या कार्यान्वित केलेल्या सुविधेत बदल करण्यात आला आहे. घाट मार्गावरील व्यवस्थेत तांत्रिक अडचणी आणि रस्त्यावर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणाऐवजी आता मौजे सप्तशृंग गड येथे ग्रामपालिका टोल नाक्यावर दर्शन पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य शासनाने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. करोनासंबंधीच्या नियमांचे पालन करत गर्दीविरहित दर्शन व्हावे म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या निर्देशानुसार विश्वस्त संस्थेने गेल्या सोमवारपासून नांदूर घाट रस्त्यावरील कमानीजवळ बंद पडलेल्या टोल प्लाझा येथे दर्शनार्थी भाविकांना (सर्व वाहनांनुसार निर्धारित संख्येने) श्री भगवती दर्शन पास वितरित करण्याची सुविधा उपलब्ध केली होती. परंतु, घाट मार्गावर गर्दी होऊन वाहतुकीत अडचणी होत असल्याने पास वितरणाच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. घाट मार्गावरील व्यवस्थेत काही तांत्रिक अडचणी उद््भवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या ठिकाणाऐवजी गुरुवारपासून मौजे सप्तशृंग गड येथे ग्रामपालिका टोल नाका येथे ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

करोना काळात दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून विश्वस्त संस्थेने प्रत्येक तासाला किती भाविक दर्शन घेऊ शकतील याचा विचार करून दर्शन पास देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार प्रति ताशी ३६० (पायी मार्गे २४० आणि रोपवे मार्गे १२०) प्रमाणे प्रति दिवशी ५७५० भाविकांची दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच भाविकांना ऑनलाइन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. शैक्षणिक स्तर, तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे ऑनलाइन दर्शन पास प्रक्रियेत अडसर होऊ नये म्हणून विश्वस्त संस्थेने मौजे नांदुरी येथे ऑफलाइन दर्शन पास देण्याची व्यवस्था कार्यान्वित केलेली आहे. या ऑफलाइन दर्शन पास प्रक्रियेत भाविकांचे नाव, संपर्क क्रमांक, भाविक संख्या, नोंदणी वेळ आणि संभाव्य दर्शनाची संधी (वेळ) तसेच थर्मल गनच्या सहाय्याने भाविकांच्या शरीराचे तापमान करून त्यांना श्री भगवती मंदिर दर्शन पास दिले जात आहेत.

हा दर्शन पास पायीमार्गे वा रोप वेच्या माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून गडावर येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथील देणगी कार्यालयात दर्शन पास उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र त्यासाठी भाविकाला प्रवास मार्गाचे तिकीट संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. करोना काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग आदींमध्ये हातांची स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतराचे पथ्य यांचे पालन करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जावे म्हणून चिन्हांकित जागा यादीसह नियोजन केलेले आहे.

करोनाच्या संदर्भात शासनाने निर्धारित केलेल्या सूचना, आदेशाचे पालन करून भाविकांनी सामाजिक अंतर, मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करून विश्वस्त प्रशासनाला सहकार्य करावे.

– गणेश देशमुख (अध्यक्ष, श्री सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट, सप्तशृंग गड)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:04 am

Web Title: darshan saptashrungi devi darshan pass on saptashring fort akp 94
Next Stories
1 त्र्यंबकात मंदिरे उघडली, पण आर्थिक उलाढाल ठप्पच
2 आता पाळीव जनावरांनाही आधार क्रमांक
3 दाभाडीत लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर
Just Now!
X