संपूर्ण राज्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने शुक्रवारी गळ्यात मद्याच्या बाटल्या घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नाशिक हे धार्मिक तीर्थस्थळ असून देशभरातील लाखो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. त्र्यंबकेश्वर, वणी व इतर अनेक धार्मिक स्थळे या भागात आहेत.

ज्या गोदावरीत स्नानासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात, ती गोदावरी दुष्काळामुळे कोरडी झाली आहे. या स्थितीत जिल्हय़ात दारूचा महापूर आला असून त्याचे विपरीत परिणाम सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यात होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत शहरात गुन्हेगारी वाढली आहे. सहा महिन्यांत २७ खून झाले. मद्यपी टवाळखोरांकडून गोंधळ घातला जात आहे.

या स्थितीत दारूबंदीची गरज दर्शवण्यासाठी आंदोलक गळ्यात मद्याच्या बाटल्या घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले.

संबंधितांचा जिल्हाधिकाऱ्यांनाही मद्याच्या बाटल्यांचा गुच्छ देण्याचा मानस होता. तथापि, हा प्रयत्न अयशस्वी ठरला.