रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

आदिवासी विकास विभागात कार्यरत रोजंदारी वर्ग चार, नॉन पेसा, स्त्री अधीक्षिका तसेच भरती प्रक्रियेतील समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार करत रोजंदारी वर्ग तीन, चार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून सामूहिक आमरण उपोषणास सुरू केले आहे.

अनुभव गुणदान करेपर्यंत निवड प्रक्रिया स्थगित करावी, स्त्री अधीक्षिकांच्या भरती प्रक्रियेत रोजंदारी स्त्री अधीक्षिकांचा समावेश होत नसल्याने ही भरती तात्काळ स्थगित करावी, जुन्या अनुभवी रोजंदारी कर्मचाऱ्यांना डावलून नवीन रोजंदारी कर्मचारी नियुक्तीचा प्रकार थांबविण्याच्या मागण्या उपोषणकर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, सकाळपासून आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन आंदोलक कार्यालयात ठिय्या देणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. संबंधितांना आंदोलनासाठी ईदगाह मैदानावर पाठविले गेले.

या भरतीत ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षक पदासाठी अर्ज केले, त्यांना अनुभव गुण अिंतम निवड यादीत वगळण्यात आले. संबंधितांचा अनुभव पदवीधर प्राथमिक शिक्षक असा असेल त्या कर्मचाऱ्यांचे अनुभव गुणदान वगळण्यात आले. मुळात शासन निर्णयाद्वारे पदवीधर प्राथमिक शिक्षक हे बी. ए. बी.एड. माध्यमिक शिक्षक समकक्ष आहेत. त्यामुळे उपरोक्त निकषाबाबत विचार करून कर्मचाऱ्यांना अनुभवाचे गुणदान करण्याची मागणी करण्यात आली. ही भरती प्रक्रिया रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जास्तीतजास्त समायोजन कसे करता येईल यासाठी राबविली. पण अनुभवाचे गुण वगळल्याने प्रत्यक्षात त्याचा त्यांना लाभ होत नसल्याचे समोर आले आहे.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

मध्यवर्ती भोजनगृह सुरू केल्याने प्रदीर्घ काळ काम करणाऱ्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना कमी केले, त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, नॉनपेसा क्षेत्रातील आदिवासी, बिगर आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात देऊन त्यांना न्याय द्यावा, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांविषयी निर्णय घ्यावा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी आदिवासी विकास विभागाला दिले आहे. सायंकाळपर्यंत आंदोलकांशी प्रशासनाकडून चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू होते.