सातपूरमधील दोन वर्षांपूवीच्या घटनेचा जिल्हा सत्र न्यायालयात निकाल

सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या कार्बन नाका परिसरात विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिच्यासह सहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी रामदास शिंदे यास फाशी सुनावली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मायलेकाच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे विवाहितेच्या तीन मुलींचे मातृछत्र हरपले. त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. त्यांना शहर सोडावे लागले. आरोपीला फाशी देण्यात येणार असल्याने न्याय मिळाल्याची भावना मयत विवाहितेच्या कुटुंबीयाकडून व्यक्त झाली.

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ मार्च २०१६ रोजी रात्री दुहेरी हत्याकांड झाले. कचरू संसारे हे त्यांची पत्नी पल्लवी (३०) आणि मुलगा विशाल (सहा) आणि तीन मुली यांच्यासोबत रंगनाथ शिंदे यांच्या भाडय़ाच्या खोलीत राहत होते. उपरोक्त दिवशी तीन मुली बाहेरगावी गेल्या होत्या. तक्रारदार संसारे रात्रपाळीसाठी कामावर गेले असताना घरमालकाचा मुलगा रामदास शिंदे हा पल्लवी यांच्याशी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात शिरला. विवाहितेने विरोध केला असता रामदासने चाकूने वार करून तिला ठार केले. त्याच वेळी पल्लवी यांचा मुलगा विशाल जागा झाला. आरोपीने त्यालाही ठार केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अमलदार गायकवाड यांनी रामदासला अटक करून सबळ पुरावे गोळा केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात झाली.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने सर्व घटनाक्रम जोडला. सर्व परिस्थितीजन्य पुरावा लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला खुनाच्या प्रकरणात दोषी ठरविले. शिक्षेबाबत दोन्ही पक्षांचे म्हणणे जाणून घेतले. गुरुवारी न्यायालयाने रामदास यास शिक्षा सुनावली. आरोपीच्या वकिलांनी आदल्या दिवशी आरोपीला दोन मुले असून त्यांच्या घरी कोणीही कर्ता नाही. त्यामुळे कमीतकमी शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा देऊ नये असा युक्तिवाद केला होता. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी त्यास आक्षेप घेतला. हा अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ गुन्हा आहे. आरोपीने पल्लवी यांच्यावर २८, तर निष्पाप विशालवर २४ वार केले. या घटनेचा कोणी साक्षीदार राहू नये म्हणून आरोपीने चिमुरडय़ाला ठार केले. आरोपीने हे दोन्ही खून अतिशय निर्दयीपणे आणि थंड डोक्याने केले. पल्लवीच्या तीन मुलींचे मातृत्व हरपले. अशा व्यक्तीला समाजात जगण्याचा हक्क नाही. अशा व्यक्तीला कठोर शिक्षा न दिल्यास समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. यामुळे आरोपीला फाशी द्यावी, अशी विनंती मिसर यांनी केली होती.

न्यायालयाच्या निकालानंतर मयत विशालचे वडील कचरू संसारे यांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करीत या घटनेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे नमूद केले. मुलींच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि त्यांना नाशिक शहर सोडावे लागले, असे त्यांनी सांगितले.

भ्रमणध्वनीत कबुली जबाब

गुन्ह्य़ात वापरलेले शस्त्र चाकू आरोपीने तपासादरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केला होता. मयतांच्या अंगावरील जखमा अशा प्रकारच्या चाकूने होऊ शकतात, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. आरोपीने गुन्हा केल्यानंतर मृतदेह ज्या खोलीत होते, त्या खोलीला कुलूप लावून पलायन केले होते. आरोपीच्या अटकेवेळी त्या कुलपाची चावी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. मयत माय-लेकांचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ होता. आरोपीच्या अंगावरील कपडय़ांवर याच रक्तगटाचे नमुने मिळून आले. आरोपीने गुन्हा घडल्यानंतर मित्र सुभाष राजपूत याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गुन्ह्य़ाची कबुली दिली होती. चौकशीत राजपूत फितूर झाला, परंतु त्याच्या भ्रमणध्वनीत आरोपीचा कबुली जबाब मुद्रित झाला होता. त्याची ध्वनिफीत तयार करून न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालासह न्यायालयात सादर करण्यात आली होती. गुन्हा सिद्ध करण्यासाठी या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्याचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.