06 March 2021

News Flash

‘ऑक्टोबर हीट’मुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट

धूर फवारणी आणि डास अळी-अंडी नष्ट करणे ही कामे नियमितपणे होत नसल्याने हे संकट ओढवले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

सलग तीन महिन्यांपासून सरासरी पावणेदोनशे इतकी असणारी डेंग्यू रुग्णांची संख्या ऑक्टोबरमध्ये सुरुवातीच्या दहा दिवसांत २७ वर आली असून संशयित रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात हा आजार अधिक्याने बळावत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने पालिकेच्या सहकार्याने विशेष कृती कार्यक्रम राबविला. त्यातच, ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवत असल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण मिळाले नाही. यामुळे ही संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

शहरी भागात स्वच्छता, धूर फवारणी आणि डास अळी-अंडी नष्ट करणे ही कामे नियमितपणे होत नसल्याने हे संकट ओढवले होते. या पाश्र्वभूमीवर, काही भाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला. सर्वसामान्यांना सलग तीन महिने डेंग्यूला तोंड द्यावे लागले. या आजाराने शहरात तीन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. हा आजार नियंत्रणात राखण्यासाठी डासांचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे ठरते. डेंग्यूने थैमान घातल्यानंतर धास्तावलेल्या आरोग्य विभागास महापालिकेच्या मदतीने विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्याची उपरती झाली. ताप रुग्णांचे सर्वेक्षण, पाणी साठणार नाही याची दक्षता, धूर व औषध फवारणी आदी कामे सुरू केली गेली. निवासी वसाहती, नवीन बांधकाम, भंगार दुकान आदी ठिकाणी जिथे पाणी साचलेले असेल, तिथे औषध फवारणी केली जाते. घराबाहेर व घरातही धूर फवारणी करण्यात आली. नागरिकांना घरात फ्रिजचा ट्रे व भांडय़ात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेमुळे ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूची लागण झालेले २७ तर डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्यांची संख्या १३८ आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली, त्या जूनपासून डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले. त्या महिन्यात एकूण ७० जणांना डेंग्यूचे तर १४२ डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण होते. जुलै महिन्यात ही संख्या दुपटीने वाढली. या काळात १४१ जणांना लागण झाली तर ३०४ रुग्ण हे सदृश आजारावर उपचार घेत होते. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ही संख्या आणखी वाढली. या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्ण्यांची संख्या अनुक्रमे १८७ व १७५ इतकी होती. डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांच्या एकूण आकडय़ाने हजाराचा टप्पा ओलांडला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हे प्रमाण कमी होत असल्याचे लक्षात येते. मागील दहा ते बारा दिवसांपासून ऑक्टोबर हीटचे चटके बसू लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास हातभार लागला. बदललेले हवामान व आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे वैद्यकीय अधिकारी विजय डेकाटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:04 am

Web Title: decline in dengue patients due to october heat
Next Stories
1 ..अखेर पोलीस सर्वशक्तिनिशी रस्त्यावर
2 ..हे आधीच का झाले नाही
3 ..तरीही स्वबळावर निवडणुका लढण्याचे काँग्रेसचे मनसुबे
Just Now!
X