नाशिक : जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २५  हजार २८८ वर पोहचली असून त्यातील १९  हजार ९५१  रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्य:स्थितीत चार हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णामध्ये २०४ ने घट झाली आहे.  करोनामुळे आतापर्यंत ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याबाबतची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक दोन हजार ८२३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाचा विचार करता नाशिक तालुक्यात २५५, चांदवड ६८ , सिन्नर २३२, दिंडोरी ४२, निफाड २८५, देवळा ७५, नांदगाव १०८, येवला २६, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ  एक, कळवण सात, बागलाण १००, इगतपुरी ४०, मालेगांव ग्रामीण १४४ याप्रमाणे एकू ण १४१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्य़ाबाहेरील आठ रुग्ण आहेत. करोनाचा संसर्ग वाढत आहे. जलद चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने बाधितांचा शोध घेण्यास मदत होत आहे.

दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता ७८.९० वर पोहचली आहे. यात नाशिक ग्रामीणमध्ये ७३.७४ टक्के, नाशिक शहरात ८२.२७, मालेगाव ६५.६७ तर जिल्हाबाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.६६  टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत ७०४ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक ग्रामीणमधील १८६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९७ आणि २१ जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.