केंद्रीय पथकाकडून निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

अवेळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्य़ात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी सकाळी केंद्रीय पथकाने केली. निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथे शेतात जाऊन पथकाने द्राक्षबागा, मका, सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी कोणतीही मदत नको, संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा, फळबागांसह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली गेली आहे. त्यानंतर केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकाने जिल्ह्य़ातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. सकाळी निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पथक पोहोचले. नुकसानग्रस्त पिकांचे अवलोकन केले. नुकसानीचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, असे आश्वासन पथकातील अधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्य़ात पावसाने सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्ष बागांचे प्रमाणही मोठे आहे. कांदा, मका, सोयाबीन आणि इतरही खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप हंगामातील पिके काढणीवर आली असताना एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त आहे. ही बाब पाहणीत पथकाच्या निदर्शनास आली. पाचोरे वणी येथील शेतकरी बाळू वाटपाडे, बाजीराव वाटपाडे, भास्कर वाटपाडे यांच्या शेतातील द्राक्षबाग, मका, सोयाबीन या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.