कचरावेचक महिला व घरकामगार यांना पिवळी शिधापत्रिका देण्यात यावी, त्यावर ३५ किलो धान्य देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी येथील लोकराज्य कचरा, पत्रा कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नाशिक जिल्ह्यातील रेशन व्यवस्था कशी पोखरली गेली आहे याकडे लक्ष वेधण्यात आले. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्याने अन्न सुरक्षा योजना, त्यातील लाभार्थी यावर प्रश्नचिन्ह उभे केले. दुसरीकडे अन्नपूर्णा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे कष्टकरी समाजाचे हाल होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. कचरावेचक महिला व घरेलू कामगारांना पिवळी शिधापत्रिका देण्यात यावी, त्यावर ३५ किलो धान्य द्यावे, केसरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, त्यावर ३५ किलो धान्य द्यावे, ६५ वर्षांवरील नागरिकांचे अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांचे धान्य सुरू करावे, सर्व असंघटित कामगारांना तात्पुरती शिधापत्रिका देण्यात यावी, अनुदान न देता घासलेट मिळावे, दिवाळीसाठी तेल, तूप, डाळी, साखरेसह जीवनावश्यक वस्तू रेशनद्वारे उपलब्ध कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. दर महिन्यात वेगवेगळ्या तारखांना धान्य उपलब्ध होते. त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण होते. त्यामुळे १० तारखेच्या आत दुकानदारांना धान्य उपलब्ध करून द्यावे, नाशिक शहरातील सर्व दुकानदारांची अ, ब, क, ड वर्गवारी करून दोषी दुकाने त्वरित बंद करावीत, नियमावली दुकानाबाहेर लावण्यात यावी, कचरावेचक कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागण्यांकडे राजू देसले, राजपालसिंग शिंदे, चित्रा भवरे, करिश्मा देशमुख, कविता वाणी आदींनी लक्ष वेधले.