वर्षे उलटल्यानंतरही रद्द तिकिटाचे पैसे परत नाही

निश्चलनीकरणानंतर सरकारने रोकडरहित व्यवहारांना चालना दिली. सरकारच्या या उपक्रमास चालना देणाऱ्या जगदीश राव यांना मात्र रोकडरहित व्यवहाराचा चांगलाच फटका बसला आहे.  रेल्वेची तिकिटे रद्द होऊन एक वर्ष झाले तरी रेल्वे प्रशासनाने राव यांना पैसे परत केलेले नाहीत. रेल्वेच्या अशा व्यवहारामुळे आता रोकडरहित व्यवहार म्हटला की चार हात लांबच राहिलेले बरे असा धसकाच त्यांनी घेतला आहे.

निश्चलनीकरणानंतर काही महिने संपूर्ण देशात चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. याच काळात सरकारने चलनी नोटांचे व्यवहार कमी करून ते रोकडरहित व्हावे, याकरिता विशेष प्रयत्न केले. सर्वसामान्यांनी रोकडरहित व्यवहार करावेत यासाठी खास नवीन योजना आणल्या. ग्रामीण भागात काही गावे दत्तक घेऊन तिथे रोकडरहित व्यवहारांसाठी आवश्यक ती साधनसामग्री, सुविधा उपलब्ध करून दिली गेली. हे व्यवहार जलद होत असल्याने चलन खिशात ठेवण्याची गरज संपुष्टात आली. रोकडरहित व्यवहारांचे विविध फायदे असले तरी त्याचे काही तोटेदेखील असल्याचे राव यांच्या उदाहरणावरून लक्षात येते. खुटवडनगर येथे वास्तव्यास असणारे जगदीश राव गॅस शेगडीच्या दुरुस्तीचे काम करतात. घरी आलेल्या नातेवाईकांना गावी परत जाण्याकरिता गतवर्षी त्यांनी रेल्वे आरक्षण केंद्रात जाऊन तिकीट नोंदणी केली होती.

२३ जानेवारी २०१७ रोजीच्या प्रवासाची वातानुकूलित शयनयानातील दोन तिकिटे होती. या तिकिटांच्या नोंदणीचे २४०० रुपये त्यांनी रेल्वेच्या केंद्रात एटीएम कार्डद्वारे दिले. तिकिटे प्रतीक्षा यादीवर असल्याने ती रद्द केली. रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत मिळण्यासाठी रीतसर मुदतीत अर्ज रेल्वेच्या तिकीट नोंदणी केंद्राकडे जमा केला. एटीएम कार्डद्वारे तिकिटाची रक्कम दिलेली असल्याने ती परस्पर बँक खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. काही दिवसांत हे पैसे खात्यात जमा होतील, अशी राव यांना अपेक्षा होती, परंतु तसे घडले नाही. महिना-दोन महिने पैसे बँक खात्यात येण्याची राव यांनी वाट पाहिली. नंतर ते पुन्हा रेल्वेच्या नोंदणी केंद्रात चौकशीसाठी गेले. या केंद्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात गेले. रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे का दिले जात नाही, याबद्दल माहिती विचारली. त्यांना त्यांचा अर्ज परताव्यासाठी मुंबईच्या रेल्वे मुख्यालयाकडे पाठविला गेल्याचे सांगण्यात आले. त्या कार्यालयाने पैसे देण्याच्या दृष्टीने काही हालचाली केल्या नाहीत. यामुळे राव यांनी मुंबईचे रेल्वे मुख्यालय गाठले. तिथेही त्यांची ऑनलाइन भरलेले तिकिटाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा केले जातील, असे सांगून बोळवण केली गेली. पुढील काळात नाशिकरोड आणि मुंबईच्या रेल्वे कार्यालयात त्यांच्या अनेक वाऱ्या झाल्या. कामानिमित्त मुंबईला गेले तरी आपल्या कष्टाचे २४०० रुपये मिळतील, या आशेने ते  कार्यालयात विचारणा करतात. परंतु आजतागायत रक्कम दिली नाही. थातूरमातूर उत्तरांनी कर्मचारी वेळ मारून नेतात, अशी राव यांची तक्रार आहे.

..रोकडरहित व्यवहारांवर फुली

एकदा हा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा कदापि रोकडरहित व्यवहार करणार नाही. कुठेही एटीएम कार्डद्वारे पैसे देणार नाही. रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळविण्यासाठी त्यापेक्षा अधिक पैसे खर्च झाले. वेळेचा कालापव्यय झाला. पैसे मात्र अद्याप मिळालेले नाहीत.

जगदीश राव