आरोग्य विभागास टाळे ठोकण्याचा भाजपचा इशारा

नाशिक : करोना काळात शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याचे खापर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर फुटू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. ही साथ नियंत्रित करण्यासाठी तातडीने कार्यवाही न झाल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर या विषयावरून राजकारण तापले आहे. शहरात धूर फवारणी, औषध फवारणी ठेकेदार तसेच आरोग्य विभागाच्या सदोष कारवाईमुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत.

ही साथ वेगाने पसरत असताना आरोग्य विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याचा आरोप फरांदे यांनी पालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनात केला. आरोग्य विभागास रुग्णांची संख्या, या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या माहिती नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ही साथ नियंत्रित करण्यासाठी डेंग्यू आणि चिकुनगुनिया रुग्णांसाठी स्वतंत्र मदतवाहिनी तयार करावी. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला आणि रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यात पाणी साचून डेंग्यूचा प्रसार होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. सफाई करण्यासाठी स्वतंत्रपणे मोहिमेची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या कार्यरत असणाऱ्या ठेकेदाराकडून धूर फवारणी, औषध फवारणी योग्य प्रकारे होत नसल्याने हा आजार फोफावत आहे,  त्यामुळे या ठेकेदारास दिलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, धूर आणि औषध फवारणीसाठी नव्याने ठेकेदार नियुक्त करण्याची मागणी फरांदे यांनी केली.