तालुक्यात अवघ्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५० ने वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे.

तालुका प्रशासनाला मंगळवारी प्राप्त ९२ अहवालांपैकी २२ अहवाल सकारात्मक, तर ७० अहवाल नकारात्मक आले. त्यात उमराणा, सावकी, मेशी, खुंटेवाडी, वाखारी प्रत्येकी एक, लोहोणेर, नाशिक, वाजगाव येथे प्रत्येकी दोन, देवळा सहा, कापशी तीन असे २२ रुग्ण सकारात्मक असल्याची माहिती देवळा तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली. ९१ स्राव देवळा येथून घेण्यात आले होते. तर एक खासगी प्रयोगशाळेतून घेण्यात आलेला एक अहवाल सकारात्मक आला.

तालुक्यातील करोनामुक्त असलेल्या अनेक गावांत करोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही प्रादुर्भाव सातत्याने वाढू लागला आहे. देवळा तालुक्यात करोना रुग्णांची संख्या आता १०० च्या पुढे गेली आहे. यातील २७ रुग्ण करोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ७० रुग्ण उपचार घेत असून काही रुग्ण देवळा येथील कोविड केअर केंद्रात, तर काही रुग्ण चांदवड येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि एक रुग्ण नाशिक येथील मविप्रच्या रुग्णालयात उपचार घेत असून एका रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.