17 January 2019

News Flash

शेतकरी ते ग्राहक नाते दृढ करण्याचा संकल्प

२१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथे प्रथमच जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव

कृषीविषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे या उद्देशाने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथे प्रथमच जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उपक्रमाची माहिती महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषिविषयक परिसंवाद, व्याख्याने या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण तसेच विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषी उत्पादन आणि विपणनास चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संयोजन समितीचे सदस्य सचिव अशोक कांबळे, सदस्य तुकाराम जगताप यांनी नमूद केले.

या महोत्सवात कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र, खाद्य महोत्सव, परिसंवाद-चर्चासत्र विक्रेता-खरेदीदार संमेलन आदींचा अंतर्भाव राहणार आहे.  विक्रेता-खरेदीदार संमेलनाद्वारे विविध खासगी भागिदारीतून सुरू असणारे प्रकल्प, कृषिमाल प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदार या सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून बाजारभिमुख कृषी विस्ताराला चालना दिली जाईल.

जिल्ह्य़ातील कृषी, कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवात कृषी विभाग, विद्यापीठ यासह ३० शासकीय विभागांचे कक्ष राहतील. शासकीय योजनांची माहिती याद्वारे शेतकऱ्यांना दिली जाईल. महोत्सवासाठी ५६ शेतकरी गटांनी नोंदणी केली असून त्यातील ३८ गट सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे आहेत. या महोत्सवातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे, बाजारपेठेची निकड आणि त्याआधारित कृषी उत्पादन आदींवर लक्ष देण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना खासगी संस्थांच्या कृषी प्रदर्शनात नसते. या महोत्सवात ती राहणार असून व्यावसायिक प्रदर्शनाप्रमाणे या महोत्सवाचे स्वरूप नसून महोत्सवात प्रवेश विनामूल्य असल्याचे संयोजन समितीने सांगितले आहे. यावेळी संयोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे उपस्थित होते.

प्रदर्शनाची वैशिष्टय़े

प्रदर्शनात खते, औषधे, बी-बियाणे, औजारे, यंत्रसामग्री, सिंचन साधने, फलोत्पादक, पॅकेजिंग आदींशी निगडित २०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. खांब नसलेला भव्य शामियाना, चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, वैविध्यपूर्ण अवजार स्पर्धा, परदेशी भाजीपाला ही प्रदर्शनाची वैशिष्टय़े राहणार आहेत.

First Published on February 7, 2018 4:13 am

Web Title: department of agriculture organize agriculture mahotsav in nashik